मुंबई : “प्रफुल पटेल शरद पवारांसोबत सतत दिसायचे, प्रफुल पटेल म्हणजे शरद पवार यांची सावली असं अनेक जण म्हणायचे. पण आता प्रफुल पटेल शरद पवारांसोबत का नाहीत? असा प्रश्न अनेक जण विचारतायत. मी या प्रश्नाच उत्तर आता देणार नाही, योग्यवेळी नक्कीच देईन” असं प्रफुल पटेल म्हणाले. “मला सुद्धा पुस्तक लिहायचा आहे, त्यात बरच काही असेल, अनुभव असतील. त्यातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल” असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं.
“आम्ही भाजपासोबत कसे गेलो? असा प्रश्न अनेक जण विचारतायत सत्तेसाठी आम्ही भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला नाही. कार्यकर्त्यांच्या हितासाठी, विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतला” असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं.
शरद पवार यांना शिव्या कोणी दिल्या?
“आम्ही भाजपासोबत गेलो म्हणून आमच्यावर विचारधारा सोडल्याची टीका होत असेल, तर महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत होतो. त्यांची विचारधारा काय होती? शरद पवार यांच्यावर सर्वात जास्त टीका कोणी केली? शिव्या कोणी दिल्या? तर शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे” असं प्रफुल पटेल म्हणाले.
शरद पवार यांना सवाल
प्रफुल पटेल यांनी विचारधारेच्या मुद्यावरुन थेट शरद पवार यांना सवाल केला. काश्मीरमधील ओमर अब्दुल्लाह यांचा नॅशनल कॉन्फरन्स पक्ष भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये होता, तो दाखला प्रफुल पटेल यांनी दिली.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याच्या घेतलेल्या निर्णयाच त्यांनी समर्थन केलं. आपला अजित पवार यांना पूर्ण पाठिंबा आहे, असं प्रफुल पटेल म्हणाले.