Maharashtra Breaking News LIVE : जालनावरून जिंतूर मार्गे परभणी जाणाऱ्या एसटी बस मंठा येथे थांबवल्या
Maharashtra Breaking News LIVE : राज्यात आता फडणवीस सरकार अस्तित्वात आलं आहे. त्यानंतर आता फडवणीस सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. याबाबतचे अपडेट्स आणि महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या....
LIVE NEWS & UPDATES
-
मंत्रीमंडळ विस्तार संदर्भात महायुतीच्या नेत्यांची उद्या मुंबईत बैठक होण्याची शक्यता.
मंत्रीमंडळ विस्तार संदर्भात महायुतीच्या नेत्यांची उद्या मुंबईत बैठक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील बैठकी नंतर राज्यात महायुतीच्या तीनही नेत्यांची वर्षा निवासस्थानी बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत मंत्री मंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार यावर शिक्कामोर्तब होईल. खाते वाटप आणि पालकमंत्री संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता.
-
इमारतीच्या बांधकामसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून नऊ वर्षच्या मुलाचा मृत्यू
नवी मुंबईतील कोपरखैरने येथील इमारतीच्या बांधकामसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून नऊ वर्षच्या मुलाचा मृत्यू झालाय. अंकित ठनूगा असे मृत मुलाचे नाव आहे. पालिका शाळेच्या बाजूला सुरू असलेल्या बांधकाम साईटवर खणलेल्या खड्डतात पडून त्याचा मृत्यू झाला. बांधकाम साईडला कुंपण नसल्यानं खेळत असलेल्या मुलाचा नाहक बळी गेल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.
-
-
जालनावरून जिंतूर मार्गे परभणी जाणाऱ्याला एसटी बस मंठा येथे थांबवल्या
मोठी बातमी समोर आली आहे. जालनावरून जिंतूर मार्गे परभणी जाणाऱ्या जवळपास 15 एसटी बस जालन्यातील मंठा येथे थांबवल्या आहेत. जालन्यातील परतूर आणि अंबड आगारातील परभणीकडे जाणाऱ्या 7 बसफेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. आंबेडकरी संघटनांकडून उद्या जालन्याच्या मंठा शहरात बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे.
-
देवेंद्र फडणवीस दिल्लीत पाच महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेणार
नवी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. फडणवीस दिल्लीत आज पाच महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेणार आहेत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती , पंतप्रधान, गृहमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
-
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. नार्वेकर यांनी मोदींसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेतली. नार्वेकर यांनी सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ही भेट घेतली.
-
-
पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे तीव्र निषेध आंदोलन
पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे तीव्र निषेध आंदोलन करण्यात येत आहे. वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून पुणे स्टेशन परिसरात रास्ता रोको करण्यात येत आहे. परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील संविधानाच्या प्रस्ताविकेचे समाजकंटकानी विटंबना केली. या कृत्याचा निषेधार्थ पुण्यात तीव्र निषेध आंदोलन केलं जात आहे.
-
गोंदियात 24868 शेतकऱ्यांनी धान विक्री केली
गोंदियात धान विक्रीसाठी 1 लाख 11 हजार 130 शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे, 24868 शेतकऱ्यांनी धान विक्री केली आहे.जिल्ह्यात 8 लाख 32 हजार 820 क्विंटल धान खरेदी झाली आहे.नवीन बिम प्रणालीमुळे शेतकऱ्यांचे चुकारे थकले आहेत.
-
-
परभणीत आंदोलकांवर अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा वापर
संविधान अपमान प्रकरणात दुकानांची जाळपोळ करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे.आंदोलकांवर अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा वापर केल्याने जमाव पांगला आहे.
-
परभणीत संविधान अपमान प्रकरणाला हिंसक वळण, दुकानांची जाळपोळ
परभणी जिल्ह्यात आंबडेकरी अनुयायांनी दुकाने पेटविल्याचा प्रकार घडला आहे.संविधानाचा अपमान केल्याने आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन सुरु केले आहे.
-
कवलापूरजवळ वाहन अपघातात तीन जण जागीच ठार
सांगलीतील कवलापूरनजिक दुचाकी आणि वडाप वाहनांमध्ये भीषण अपघात होऊन तीन जण जागीच ठार , एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. मृतातमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.
-
पोलिसांनी आरोपींची काढली धिंड
नांदेड पोलिसांनी रस्त्यावरून आरोपींची धिंड काढली आहे. मुख्य बाजारपेठेतू हातात तलवार घेऊन आरोपी दहशत माजवित होते. ज्या बाजारपेठेत तलवार घेऊन दहशत पसरवत होते त्याच बाजारातून पोलिसांनी त्यांची धिंड काढली.
-
नाशिकमध्ये लागले “ईव्हीएम “विरोधात बॅनर
“लोकशाही वाचवण्यासाठी ईव्हीएम हटवण्यासाठी मी येतोय तुम्ही पण या” या आशयाचे बॅनर लागले आहे. १३ डिसेंबर रोजी निघणाऱ्या ईव्हीएम विरोधातील मोर्चाचे असे बॅनर नाशिकमध्ये लागले आहेत.
-
ई पॅाश मशिनमध्ये तांत्रिक अडचणी, धान्य वाटप रखडले
राज्यभरातील सरकारी स्वस्त धान्य दुकानात सरकारकडून धान्याचा पुरवठा झाला आहे. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे वितरण रखडले. ई पॅाश मशिनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने धान्याचे वाटप होत नाही.
-
मंत्रिमंडळ विस्तारासाठी फडणवीस दिल्लीला रवाना
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यास रवाना झाले आहेत.
-
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत १० हजार बहिणी अपात्र
पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत १० हजार बहिणी अपात्र ठरल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जाची छाननी सुरू केली. त्यात या बहिणी अपात्र ठरल्या आहेत.
-
पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत १० हजार बहिणी अपात्र
पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत १० हजार बहिणी अपात्र ठरल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जाची छाननी सुरू आहे. जिल्ह्यातील २० लाख ८४ हजार अर्जदारांना योजनेचा लाभ झाल्याची महिला बालकल्याण विभागाने माहिती दिली.
योजनेसाठी १५ ऑक्टोंबर पर्यंत जिल्ह्यातून २१ लाख ११ हजार ३६३ मंजूर करण्यात आले होते. अजूनही १२ हजार अर्जाची छाननी बाकी आहे. आत्तापर्यंत ९ हजार ८१४ अर्ज त्रुटीमुळे अपात्र ठरवण्यात आले आहेत. तर ५ हजार ८१४ अर्जामध्ये किरकोळ त्रुटी सापडल्याने तात्पुरते नाकारण्यात आले आहेत.
-
14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल असं दिसतंय- संजय शिरसाट
“आपल्याच माध्यमातून मला समजतंय की मंत्रिमंडळ विस्तार आता लवकरच होत आहे. त्यामुळे 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल असं दिसतंय. आज राज्याचे तीन प्रमुख नेते दिल्लीला जात आहेत आणि काहीतरी महत्त्वाचा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे,” असं संजय शिरसाट म्हणाले.
-
नवी दिल्ली- राज्यसभेत आज जोरदार गोंधळ
नवी दिल्ली- राज्यसभेत आज जोरदार गोंधळ पहायला मिळाला. सभापती जगदीप धनकड यांनी स्पष्ट केलं की माझ्याविरोधात एकूण पाच नोटिशी प्राप्त झाल्या आहेत. “72 वर्षानंतर एका शेतकऱ्याचा मुलगा राज्यसभेत सभापती झाले, उपराष्ट्रपती हेच सभापती आहेत. त्यांच्या पदाचा सन्मान तुम्ही ठेवत नाही,” अशा शब्दांत संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
“सोरोस यांचीच भाषा विरोधक देशात वापरतात. जगदीप धनकड यांनी पदावर असताना आणि पदावर नसतानाही शेतकऱ्यांसाठी, देशाच्या संविधानाच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले आहेत,” असं ते पुढे म्हणाले. रिजिजू यांच्या भाषणानंतर विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. त्यानंतर राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.
-
काँग्रेसचे लोकप्रतिनिधी अस्वस्थ, काँग्रेसला त्यांची माणसं सांभाळता येत नाहीत- बावनकुळे
“काँग्रेसला त्यांची माणसं सांभाळता येत नाहीत. काँग्रेसचं आमदार-खासदारांकडे दुर्लक्ष होतंय. काँग्रेसमध्ये आमचं भविष्य चांगलं नाही, असं काही खासदार म्हणतात. आम्हाला ऑपरेशन लोटस राबवण्याची गरज नाही. काँग्रेसचे लोकप्रतिनिधी अस्वस्थ आहेत,” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
-
शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर अरविंद केजरीवाल ॲक्टिव्ह मोडवर
नवी दिल्ली- शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर अरविंद केजरीवाल ॲक्टिव्ह मोडवर आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत आज मुख्य निवडणूक आयुक्तांची केजरीवाल भेट घेणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता ही भेट होणार आहे. मतदार यादी आणि ईव्हीएमबाबत मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत केजरीवाल चर्चा करणार आहेत. काल रात्रीच शरद पवार यांच्यासोबत केजरीवाल यांची बैठक झाली होती.
-
विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर आता भाजपकडून महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात
विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर आता भाजपकडून महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यात भाजपकडून बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
एका विधानसभा मतदारसंघात 50 हजार ते एका प्रभागात 10 हजार भाजप सदस्य नोंदणीला भाजपकडून सुरुवात झाली आहे.
पुढील आठवड्यापासून भाजपकडून प्रभागनिहाय बैठका घेतल्या जातील. तसेच महापालिका निवडणुकांसाठी भाजपकडून प्रत्येक मतदारसंघात निरीक्षक नियुक्त केले जाणार आहेत.
-
विरोधी पक्ष नेतेपदासाठी अद्याप कुठलाही अर्ज नाही – राहुल नार्वेकर
विरोधी पक्ष नेतेपदासाठी अद्याप कुठलाही अर्ज नाही. विरोधकांकडून अर्ज आल्यावर विचार केला जाईल, असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.
-
परभणी जिल्ह्यात आंबेडकरी अनुयायांकडून बंदची हाक
परभणी जिल्ह्यात आंबेडकरी अनुयायांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. संविधानाची विटंबना केल्याप्रकरणी आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले आहेत. कालही परभणीत तणावपूर्ण वातावरण होतं, बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परभणी- नांदेड रस्त्यावर टायर पेटवून वसमत रस्ता अडवण्यात आला.
-
अदानीला महाराष्ट्र गिळता यावा, यासाठी गैरमार्गाने सरकार स्थापन केले – संजय राऊत
राज्य अदानींच्या घशात घालण्यासाठी सरकार बसवलं गेलं आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे भीतीपोटी भाजपसोबत गेले. जगातल्या मोठ्या उद्योगपतीला जकात नाकाही चालवायचा आहे. अदानीला महाराष्ट्र गिळता यावा, यासाठी गैरमार्गाने सरकार स्थापन केले, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली
-
निकाल लागल्यानंतर दोन आठवडे उलटले, तरी काँग्रेस गटनेत्याची निवड नाही
काँग्रेस गटनेत्याची अद्याप निवड करण्यात आलेली नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप गटनेता निवड न झाल्याने पक्षातील नेत्यांची अस्वस्थता वाढली आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन नव्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन नव्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचे बोललं जात आहे. अतुल सावे, प्रशांत बंब, संजय शिरसाट, रमेश बोरणारे, प्रदीप जयस्वाल, विलास भुमरे यांच्यातील तिघांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल, असे बोललं जात आहे.
-
कागलमधील अदानी ग्रुपचा चेक पोस्ट अखेर सुरू
कोल्हापूर : कागलमधील अदानी ग्रुपचा चेक पोस्ट अखेर सुरू करण्यात आला आहे. लोरी ऑपरेटर असोसिएशन आणि स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध डावलून अदानी ग्रुपकडून चेक पोस्ट सुरू करण्यात आला आहे. सध्या या ठिकाणाहून पोलीस बंदोबस्तात मालवाहतूक वाहनांची तपासणी केली जात आहे. कागलमधील या नवीन चेक पोस्टला मोठा विरोध होत आहे. जीव गेला तरी चेक पोस्ट सुरू राहू देणार नाही, अशी भूमिका लोरी ऑपरेटर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
-
इगतपुरीत गुटख्याचा ट्रक जप्त, 1 करोड 53 लाख 54 हजाराचा मुद्देमाल जप्त
इगतपुरी : स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. समृद्धी महामार्गावरील पिंपरी फाटा इंटरचेंजवर प्रतिबंधित गुटख्याचा ट्रक जप्त केला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. गुटख्याच्या 151 गोण्यासहित एकूण 1 करोड 53 लाख 54 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
-
मुंबईतील हवा पुन्हा दुषित, तापमान किती?
मुंबईतील हवा पुन्हा दुषित झाली आहे. एक्युआय ११९ वर पोहोचला आहे. त्यासोबतच थंडीचा जोर ओसरला. किमान तापमान १८ अंशांवर पोहोचलं आहे. आज २० अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी १३.७ अंशांवर तापमान घसरल्यानंतर मुंबईतील किमान तापमान मंगळवारी १८ अंशांवर पोहोचल्याची नोंद झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार वाऱ्याच्या दिशांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे तापमान वाढ होण्याची शक्यता आहे.दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागर आणि लगतच्या पूर्व विषुववृत्तीय हिंद महासागर क्षेत्रातील कमी दाबाचा पट्टा १० डिसेंबर रोजी तीव्र झाला. परिणामी, दक्षिण-पुर्व वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईसाठी आतापर्यंतचे सर्वात कमी किमान तापमान १०.६ अंश होते, जे २० डिसेंबर १९४९ रोजी नोंदवले गेले होते.
-
पुणे -नाशिक महामार्गावर भीषण अपघात
पुणे -नाशिक महामार्गावर कळंब येथे टेम्पो आणि पिकअपमध्ये भीषण अपघात झाला आहे. पहाटेच्या सुमारास अपघात घडला. एकाचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. पुणे नाशिक महामार्गावर सिमेटीकरणाचे काम सुरू असल्याने एक लेन ने वाहतूक सुरू असल्याने घटना घडली आहे. एक लेन ने वाहतूक सुरू असताना कोणतेही दिशा दर्शक फलक नसल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अपघातानंतर पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.
-
धुळे पारा घसरला
धुळे शहरासह जिल्हामध्ये यंदाच्या हंगामातला सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा विक्रमी 4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलेला आहे. प्रचंड थंडी आणि गार वारा यामुळे पांजरा नदी किनारी फिरणाऱ्यांची गर्दी वाढली. वाढलेल्या थंडीमुळे व्यायाम प्रेमी फिरण्यासाठी व्यायामासाठी पादरा नदी किनारी येत आहेत थंडीमध्ये व्यायाम केल्यास शरीराची झीज भरून निघते ती आयुष्यभर टिकते. थंडीमध्ये व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. कडाक्याच्या थंडीमध्ये उबदार कपड्यांची मागणी प्रचंड वाढलेली आहे. आठवड्याभरात 18° c वरून तापमानाचा पारा थेट चार अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलेला आहे.
-
कापूस व्यापारावर मोठा परिणाम, मजुरांच्या हाताला काम मिळेना
अमरावती जिल्ह्यात कापसाच्या जिनिंग उद्योगाला फटका बसला आहे. 5 हजारांपेक्षा अधिक मजुरांना काम मिळत नाही. क्षमतेच्या 25 टक्के इतकेच काम आहे. कापसाची आवक थांबल्याने जिल्ह्यातील 60 कापूस युनिटवर घरघर पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाची मागणी घटल्याने कापूस व्यापारावर मोठा परिणाम होणार आहे. कापसाची थांबली आहे निर्यात कापूस बाजारपेठेत मंदी आहे. बाजारपेठेमध्ये कापसाला सध्या 7 हजार 100 रुपये इतका दर मिळत आहे.
महाराष्ट्रात राजकीय घडमोडींना वेग आला आहे. येत्या 16 डिसेंबरपासून विधिमंडळाचं अधिवेशन सुरु होणार आहे. त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. येत्या दोन दिवसात फडणवीस सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपधविधी (Devendra Fadnavis Government Cabinet Expansion) होणार आहे. फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेचे 13 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबई पुण्यासह राज्यातील इतर शहरात आणि विशेषत: ग्रामीण भागात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे लोकांनी शेकोटीचा आधार घेतला आहे. मुंबईत हवेची गुणवत्ता पुन्हा घसरली आहे. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा हा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
Published On - Dec 11,2024 8:08 AM