Police Bharti 2024 : पाणी, जेवणाचीही सोय नाही, ना शौचालयं… मुंबईत पोलीस भरतीत सोयींचा अभाव..
राज्यभरात सध्या पोलीस भरतीचे सत्र सुरू असून मुंबईत 3 तारखेपासून पोलीस भरती सुरू झाली आहे. पोलीस भरतीसाठी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मरीन ड्राइव्ह परिसरातील मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल येथे मुलींची भरती घेण्यात येत आहे.
राज्यभरात सध्या पोलीस भरतीचे सत्र सुरू असून मुंबईत 3 तारखेपासून पोलीस भरती सुरू झाली आहे. पोलीस भरतीसाठी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मरीन ड्राइव्ह परिसरातील मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल येथे मुलींची भरती घेण्यात येत आहे. मात्र याठिकाणी येणाऱ्या मुलींकरता व त्यांच्या पालकांसाठी प्रशासनाच्या वतीने कुठलीही सोय केलेली नाहीये असा आरोप मुलींच्या वतीने करण्यात येत आहे. मुलींसाठी शौचालयाची सुद्धा सोय नाही, तसेच पाणी , जेवण याची देखील कुठेही सोय करण्यात आलेली नाही, असा आरोप अनेकांनी केला आहे. सध्या राज्यभरासह मुंबईतही मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र या ठिकाणी साधी छताची देखील सोय केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेतील सुविधांवरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
पोलिसांसाठी खूशखबर; राज्यातील पोलीस दलास मिळणार नवी वाहने
दरम्यान राज्यातील पोलिसांसाठी खूशखबर आहे. पोलीस दलास नवी वाहनं मिळणार आहेत. राज्य पोलिस दलासाठी तब्बल 566 कोटी रुपये किंमतीची 2289 वाहनं खरेदी करण्यासाठी गृह विभागाने मंजुरी दिली आहे. पोलिस अधिकाऱ्यांसाठी वाहने, जोरात पाणीफवारा करणारी ‘वरुण’, कंट्रोल व्हॅन, वॉटर टँकर आदींसह श्वानांच्या एसी वाहनांचा त्यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने वाहनांच्या कमतरतेची स्यू-मोटो दखल घेत, वाहनखरेदीला तातडीने मान्यता देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार, या खरेदीला आता सुरुवात होणार आहे.
आरोपींना नेण्यासाठी झाला होता रिक्षाचा वापर
नालासोपारा येथील तुळींज पोलिस ठाण्यातून आरोपींना न्यायालयात तसेच तुरुंगात नेण्यासाठी रिक्षाचा वापर केल्याचे वृत्त डिसेंबर २०२३मध्ये एका वृत्तपत्राने दिले होते. या वृत्ताची स्यू-मोटो दखल घेत राज्य मानवी हक्क आयोगाने राज्य सरकारला याविषयी विचारणा केली. त्यावर पोलिस महासंचालक कार्यालयाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, 2289 वाहनांची राज्यभरात (मुंबई वगळून) कमतरता असल्याचे मान्य करत त्यांच्या खरेदीची कार्यवाही सुरू असल्याचे नमूद केले होते. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती के.के. तातेड यांनी, ही वाहन खरेदी लवकरात लवकर करण्याचे निर्देश पोलिस महासंचालक कार्यालय आणि राज्य सरकारला दिले होते.
राज्यातील पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्यातील पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य पोलिस सेवेतील पोलिस उपायुक्त तथा पोलिस अधीक्षक दर्जाच्या १६ अधिकाऱ्यांच्या दल्या झाल्या आहेत. गृह विभागाकडून मंगळवारी रात्री आदेश काढण्यात आला. पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांची पोलिस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक याठिकाणी बदली करण्यात आली आहे. गडचिरोली येथील राज्य राखीव पोलिस बलाचे समादेशक विवेक मासाळ यांची पुण्यात पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.