राज्यात सर्वत्र पोलिस भरती प्रक्रिया सुरु आहे. या पोलिस भरतीसाठी लाखो उमेदवार कसून तयारी करीत आहेत. पोलिस भरतीची तरुण वाट पाहात असतात. कारण सरकारी नोकरी करण्याची संधी मिळत असल्याने यासाठी उच्च शिक्षित तरुणही नोकरी मिळावी म्हणून जोरदार तयारी करीत आहेत. पोलिस भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी यात कोणाला डावलले जाऊ नये, तसेच पैशांचा गैरवापर होऊ नये यासाठी यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. यंदा पोलीस भरतीत योग्य उमेदवाराची निवड केली जावी यासाठी रेडीओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्र ( RFID ) वापर करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसणार असल्याचे म्हटले जात आहे.
राज्यात पोलिस भरती सुरु आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलातील पोलिस शिपाई 448 आणि चालक पोलिस शिपाई 48 पदे भरण्याची तयारी पूर्ण झाली आहे. पोलिस शिपाई- चालक पदासाठी मैदानी आणि चाचणी परीक्षा 19 जुन ते 28 जुन 2024 या कालावधीत घेण्यात येणार आहे. यासाठी 5 हजार 3140 उमेदवार यांनी अर्ज केले आहेत, तर पोलिस शिपाई पदासाठी 42 हजार 403 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पोलिस शिपाई भरती प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी आरएफआयडी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असल्याचे पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी म्हटले आहे.
जर पावसामुळे एखाद्या दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढची योग्य तारीख दिली जाणार आहे. काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरिता एका पेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल. काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर केले जाईल. पोलीस भरती 2022-23 मध्ये एकापेक्षा जास्त पदाकरीता अर्ज केले आहेत आणि ज्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल तर अशा उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळया तारखा दिल्या जातील. याबाबत उमेदवारांना अडचण किंवा शंका असल्यास त्यांनी raunak.saraf@mahait.org यावर ईमेल करावा. मात्र या करीता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुस-या मैदानी चाचणीवेळी सादर करावेत असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे.
सध्या महाराष्ट्रात पोलीस भरती 19 तारखेपासून सुरू झाली आहे. पावसाळी वातावरणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. पावसाळा संपेपर्यंत ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी पोलीस भरती प्रकियेचा सराव करणाऱ्या विद्यार्थी आणि अँकडमी शिक्षकांनी केली आहे. यावेळी सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरती प्रकिया थांबली पाहिजे अशी घोषणाबाजी केली.
चंद्रपुरात 137 शिपाई पदे आणि 9 बॅण्ड्समन जागेसाठी पोलीस भरतीचे आयोजन केले आहे. शिपाईपदासाठी एकूण 22,583 उमेदवारी अर्ज तर बॅण्ड्समन पदासाठी असे 2722 उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यात 2176 आणि महिला उमेदवार 646 तसेच 1 तृतीयपंथी असे उमेदवारांचे अर्ज आले आहेत. जिल्हा क्रीडा संकुलात 22 दिवस भरती प्रक्रिया चालणार आहे. चंद्रपुरातील जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारावर उमेदवारांचे ओळखपत्र बघुन आतमध्ये उमेदवारांना शैक्षणिक कागदपत्रे घेवुन प्रवेश दिला जाईल. उमेदवारांची हजेरी घेवुन त्यांना छाती / उंची मोजमाप करुन त्यांचे कागदपत्र तपासण्यात येतील व बायोमॅट्रीक हजेरी घेवुन उमेदवार यांना चेस्ट क्रमांक वाटप करुन शारिरीक चाचणी करीता मैदानावर पाठविण्यात येईल. मैदानावर उमेदवारांची शारिरीक चाचणीमध्ये पुरुषाची 100 मीटर / 1600 मीटर आणि महिलाची100 मीटर/800 मीटर धावण्याची चाचणी ही कृत्रीम धावपट्टी SYNTHETIC TRACK वर घेण्यात येईल. त्यामध्ये उमेदवारांना SPIKE SHOES वापरता येणार नाही. उमेदवारांनी कोणत्याही उत्तेजनार्थ पदार्थाचे सेवन करणार नाही. याबाबत त्यांचेकडून हमीपत्र घेण्यात येणार आहे. जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी झाली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यात 19 जून रोजी 137 जागांसाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भरती सुरु आहे. 137 जागांसाठी पुरुष आणि महिला उमेदवारांचे एकूण 6 हजार 557 आले आहेत अर्ज. जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदानावर पोलीस भरतीची प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. पावसाचा व्यत्यय येऊ नये म्हणून वेगवेगळ्या चाचण्यांसाठी मैदानावर वाटरप्रूफ मंडप उभारण्यात आलेले आहेत. 100 मीटरचा ट्रॅक पावसामुळे खराब होऊ नये म्हणून ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी पहिल्यांदाच धावण्याच्या चाचणीसाठी इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर केला जाणार आहे. 19 जूनपासून भरती सुरु असून यात पुरुष तसेच महिला उमेदवारांच्या शारीरिक मैदानी कागदपत्रे तपासणीसह तसेच इतर प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.संपूर्ण भरती प्रक्रिया ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे निगराणीत पार पडणार आहे.