“म्हणून उद्धव ठाकरे सतत एकनाथ शिंदेंबद्दल बोलत असतात…” भाजपचा टोला
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील फुटीवर भाजपवर टीका केल्यानंतर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. बावनकुळे यांनी ठाकरेंना पक्ष वाढीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आणि भाजपच्या कार्यांचे समर्थन केले.

शिवसेना एकच आहे. दुसरी गद्दार सेना आहे. तिला शिवसेना म्हणू नका. शिवसेनेला जेव्हा मुस्लिमांना मोठं मतदान केलं. तेव्हा सत्ता जिहाद म्हणाले. ती गद्दार सेना आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्घव ठाकरे यांनी टीका केली आहे. आता या टीकेला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडेतोड उत्तर दिले. उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या पक्ष वाढीकडे लक्ष द्यावे, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबद्दलचीही माहिती दिली. तसेच रमजान ईद आणि ‘सौगात ए मोदी’ उपक्रमाबद्दलही त्यांनी माहिती सांगितली.
त्यांनी आपल्या पक्षाकडे लक्ष केंद्रित करावे
उद्धव ठाकरेंना भविष्य दिसत नाही. त्यांना असे वाटते की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले तर ते भाजपपासून दूर जातील. त्यांना काही राजकीय फायदा मिळेल. म्हणूनच ते सतत शिंदे यांच्याबद्दल बोलत असतात. उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या पक्ष वाढीकडे लक्ष द्यावे. त्यांचा पक्ष रोज तुटत आहे. त्यांनी आता तरी उरलेल्या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी वेळ द्यावा. मोदी, शहा, फडणवीस आणि शिंदे यांच्यावर टीका करण्याऐवजी त्यांनी आपल्या पक्षाकडे लक्ष केंद्रित करावे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
यावेळी पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी नागपूर दौऱ्याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्च रोजी सकाळी नागपूरला येथील रेशीमबागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देतील. त्यानंतर ते दीक्षाभूमी आणि माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमात उपस्थित राहतील. यानंतर पंतप्रधान सोलर एक्स्प्लोसिव्ह इंडस्ट्रीजला देखील भेट देणार आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
प्रत्येक नागरिक आम्हाला सारखाच
भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करत आहे. शहरात ४७ ठिकाणी मोदींचे भव्य स्वागत केले जाणार आहे. तसेच भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीने मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या माध्यमातून ‘सौगात ए मोदी’ देण्याचे नियोजन केले आहे. हा पूर्णपणे पक्षाचा कार्यक्रम आहे. त्यासाठी भाजप पुढे आली आहे. आम्ही मुस्लिम विरोधी नाही. आमचा विरोध त्या लोकांशी आहे जे या देशात राहून पाकिस्तानचा ध्वज फडकवतात आणि पाकिस्तानचे गुणगान गातात. उद्धव ठाकरे यांच्या खासदारांच्या नाशिक आणि परभणी येथील विजयी रॅलीमध्ये पाकिस्तानचे ध्वज फडकले होते. अशा गोष्टींना आमचा विरोध आहे. पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फोडणाऱ्यांविरोधात आमची भूमिका आहे. देशातील सर्व मुस्लिम आमच्या विरोधात नाहीत, तर प्रत्येक नागरिक आम्हाला सारखाच आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटले.