Sanjay Raut : अमित शाहांचे ते विधान म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा अपमान – संजय राऊत
संजय राऊत यांनी अमित शहा यांच्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांवरील टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शहा यांनी शिर्डीतील सभेत केलेल्या आरोपांना राऊत यांनी खोडून काढले. त्यांनी भाजपवर गद्दारीला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला आहे आणि उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणे हे बाळासाहेब ठाकरेंचा अपमान असल्याचे म्हटले आहे. राऊत यांच्या या प्रत्युत्तराने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पक्षाची रोजीरोटी आहे. दगाफटका कोणी केला, गद्दारांना सोबत घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं आणि तेच दग्या-फटक्याची भाषा करत आहेत. या देशामध्ये गद्दारीला, बेईमानीला, घटनाबाह्य कामांना भारतीय जनता पक्षाने, नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी खतपाणी घातलं आहे. हेच अमित शाह, स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत आहेत. शरद पवारांच्या पक्षावरही ते टीकास्त्र सोडतात. उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाहांवर हल्लाबोल चढवत त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.
शिर्डीतल्या काल झालेल्या भाजपच्या मेळाव्यात अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. महाराष्ट्राच्या विजयाने १९७८ पासून शरद पवारांनी जे दगा फटक्याचं जे राजकारण होतं ते २० फूट गाडण्याचं काम केलं. उद्धव ठाकरेंनी आपल्याशी जो द्रोह केला, २०१९ ला विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धातांशी तडजोड केली. फसवणूक करुन, लबाडी करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली, अशा शब्दांत अमित शाह यांनी हल्ला चढवला होता. संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना शाह यांच्या सर्व आरोपांना चोख प्रत्युत्तर देत, भाजप, मोदी शाहांमुळेच राज्यात गद्दारीला खतपाणी मिळाल्याचे टीकास्त्र सोडलं.
हा महाराष्ट्राचा अपमान
उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे, ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर अजून तुम्ही पोट भरताय, त्यांचा हा घोर अपमान आहे. महाराष्ट्रात येऊन तुम्ही हे विधान करता आणि समोर बसलेले काही लोक त्यावर टाळ्या वाजवत होते, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. शरद पवार यांनी त्यांची अख्खी हयात राजकारणात, समाजकारणात, सार्वजनिक जीवनात घालवली, आणि त्याबद्दल मोदींच्या सरकारने त्यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा, सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मविभूषण हा पुरस्कार दिला आहे. महाराष्ट्रात येऊन त्याच शरद पवारांवरती सडक्या शब्दांत वक्तव्यं करणं हे भाजपच्या महाराष्ट्रतल्या नेत्यांना आवडलंय का , हा खुलासा त्यांनी करावा. राज्याबाहेरचे कोणीही लोक येतात, भले ते गृहमंत्री असोत, केंद्रीय मंत्री असोत पण ते महाराष्ट्रात येऊन असे वक्तव्य करत आहेत.
त्यांना लाज वाटली पाहिजे
या राज्याला एक स्वाभिमान आहे, आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शरद पवारांपर्यंत अनेक नेत्यांचं हे राज्य घडवण्यात योगदान आहे. तुम्ही आमच्या राज्यात येऊन अशी टीका करता, जी भाषा वापरता, ती समोर बसलेले लोक ऐकून घेतात, गुलामांची औलाद ते ऐकून टाळ्या वाजवतात, त्यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत राऊतांनी हल्लाबोल चढवला.