बिनखात्याचं मंत्री केलं तरी एकनाथ शिंदे मंत्रिपद सोडणार नाहीत; संजय राऊत यांचा टोला
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे दिल्लीत गेले आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. मुंडे यांचे नेते अजित पवार आहेत. पण मुंडेंना खुलासा द्यायला दिल्लीत जावं लागतं. त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष बारामतीत आहेत. तरीही ते दिल्लीत गेले. ही महाराष्ट्राची अवस्था आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
![बिनखात्याचं मंत्री केलं तरी एकनाथ शिंदे मंत्रिपद सोडणार नाहीत; संजय राऊत यांचा टोला बिनखात्याचं मंत्री केलं तरी एकनाथ शिंदे मंत्रिपद सोडणार नाहीत; संजय राऊत यांचा टोला](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/raut-vs-shinde.jpg?w=1280)
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. आपण नाराज आहोत की नाही हे एकनाथ शिंदे यांनी स्वत:हून समोर येऊन सांगितलं पाहिजे. किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरी याचा खुलासा केला पाहिजे, असं सांगतानाच एकनाथ शिंदे ज्या अर्थी मंत्रिपदाच्या खुर्चीला चिटकून बसले आहेत, त्या अर्थी ते नक्कीच नाराज नाहीत. त्यांना बिनखात्याचं मंत्री केलं तरी ते मंत्रिपद सोडणार नाहीत, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
एकनाथ शिंदे नाराज आहे की नाही त्यांनी सांगितलं पाहिजे. किंवा त्यांचे बॉस देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी याबाबत सांगावं. ज्या अर्थी एकनाथ मंत्रीपदाला चिटकून बसले आहेत. त्या अर्थी ते नाराज नाहीत. त्यांनी बिनखात्याचं मंत्री केलं तरी ते मंत्रीपद सोडणार नाहीत. तेवढी हिंमत लागते. कारण त्यांच्या डोक्यावर ईडी आणि सीबीआयची तलवार आहे. अशा लोकांना बिनखात्याचं मंत्री केलं तरी ते गप्प बसतील. ते कसं काय सांगतील मी नाराज आहे? असा खोचक सवालच संजय राऊत यांनी केला आहे.
गणेश नाईक एकनाथ शिंदेंना सीनिअर
एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांना घेरण्यासाठीच गणेश नाईक सरसावल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरूनही राऊत यांनी टोलेबाजी केली. गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना सीनिअर आहेत. शिवसेनेत असताना गणेश नाईक मंत्री होते तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते. गणेश नाईक कोणत्या पक्षात आहेत हे सोडा. पण ते एकनाथ शिंदेंना वरिष्ठ आहेत. त्यांचा अनुभव मोठा आहे. आवाका मोठा आहे. मंत्री म्हणून त्यांचा अधिकार आहे. नाईक यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदेंनीही फिरावं. त्यांनी नवी मुंबईत जावं. पण ते रुसून बसले आहेत, असा चिमटा राऊत यांनी काढला.
आतापर्यंत एकच पक्ष बदलला
गणेश नाईक भाजपचे नेते आहेत. ते आधी राष्ट्रवादीत होते. त्या आधी शिवसेनेत होते. नाईकांचा प्रवास मोठा आहे. एकनाथ शिंदे यांचा प्रवासाला आता सुरुवात झाली. शिंदेंनी आतापर्यंत एकच पक्ष बदलला आहे. दोन तीन पक्ष बदलल्यावर त्यांची स्पर्धा सुरू होईल सीनिअॅरिटीची, असा टोलाही त्यांनी लगावला.
महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. फडणवीस हे महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून नेहमी जात असतात. आधी दावोसला होते. आता दिल्लीत गेले. अजून कुठे जातील माहीत नाही. आपल्या शिरावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी ते स्टार प्रचारक आहे. महाराष्ट्रात त्यांच्या पक्षांनी जागा जिंकल्या आहेत. त्याचं श्रेय फडणवीस यांना मिळतयं. महाराष्ट्राचाच फॉर्म्युला दिल्लीत वापरला तर प्रचाराला जायचीही गरज नाही. महाराष्ट्रातील विजयाचा फॉर्म्युला आणि विजयाचा पॅकेज तिथे वापरायचं ठरवलं असेल तर प्रचार करण्याची गरज नाही. बुथवर जायची गरज नाही. दिल्ली लहान राज्य आहे. केंद्रशासित आहे. त्यामुळे दयाबुद्धीने ते वेगळा विचार करू शकतात, असे चिमटे त्यांनी काढले.