पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी पाणीच पाणी; काळीज पिळवटून टाकणारी पाच दृश्ये…
Maharashtra Rain Update : राज्यातल्या अनेक शहरांमध्ये बाजारपेठा रस्ते, घरं पाण्याखाली गेली आहेत. राज्यभर पावसाचा हाहा:कार, पावसामुळे अतोनात नुकसान; पाहा व्हीडिओ...
मुंबई : राज्यात मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याची दृश्ये समोर येत आहेत. राज्यातल्या अनेक शहरांमध्ये बाजारपेठा रस्ते, घरं पाण्याखाली गेली आहेत. मुंबईसह पुण्यात धो-धो पाऊस कोसळतोय. अशातच कोल्हापूर जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. बुलढाणा संग्रामपूर तालुक्यात पावसामुळे हाहा:कार पाहायला मिळतोय. राज्याच्या विविध भागातील पावसाचा आढावा घेऊयात…
कोल्हापूरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. आज कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. धरण क्षेत्रासह शहर परिसरातही पहाटेपासून जोरदार पाऊस बरसतोय. पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरु आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फुटांवर आहे. तर पाणी पातळी आता 36 फुटांवर पोहोचली आहे. 68 बंधारे पाण्याखाली गेलेत. राधानगरी धरण 75 टक्के भरलं आहे. आज कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरही पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय. आंब्याजवळ घोळसवडे पुलावर पाणी आलं आहे. पुलावर आलेल्या पाण्यातून धोकादायक अवस्थेत वाहतूक सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्याने पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पावसामुळे हाहा:कार पाहायला मिळतोय. तर जळगाव जामोद तालुक्यात सुद्धा पावसाने धुमाकुळ घातलाय. केदार नदीला आला पूर, नदीकाठच्या घरात पाणी शिरलं आहे. नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी उंच भागात धाव घेतली आहे.
जळगाव जामोद तालुक्यातलं लेंडी नदीला पूर आला आहे. पुराचं पाणी जळगाव जामोद शहरात शिरलं आहे. त्यामुळे जळगाव संग्रामपूर रास्ता बंद आहे. आसलगाव नदीला पूर आल्याने आसल गाव तर जळगाव जामोद रास्ता ही बंद आहे.
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. परभणी,धाराशिव,लातूर,नांदेड या जिल्ह्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार सध्या या भागात मुळधार पाऊस पडतोय. मराठवड्यात हवामान खात्याने येलो अलर्टचा इशारा दिला आहे. मराठवाड्यात इतर विभागांपेक्षा कमी प्रमाणात पाऊस असेल. मराठवाड्यातील धरणांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आज हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या आष्टी येथील वैनगंगा नदी पुलावर पुराचं पाणी पाहायला मिळतंय. पाऊस सतत सुरू राहिल्यास हा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख मार्ग बंद असताना आज अहेरी इथल्या अतिरिक्त जिल्हा न्यायालय इमारत उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस होणार होतं. पण त्यांचा हा दौरा रद्द झाला आहे.