मुंबई | 19 नोव्हेंबर 2023 : आज क्रिकेट प्रेमींसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण वर्ल्ड कपचा फायनल सामना आज होत आहे. गुजरातच्या अहमदाबाद स्टेडियममध्ये हा महामुकाबला होणार आहे. या सामन्याकडे केवळ भारतच नाही तर जगाचं लक्ष आहे. भारतीय संघाने हा वर्ल्डकप जिंकावा, यासाठी क्रिकेटप्रेमी त्यांना भरभरून शुभेच्छा देत आहेत. महाराष्ट्रातल्या शहराशहरात, गावागावात क्रिकेटचा फिवर पाहायला मिळतोय. भारतीय संघाच्या जर्सीसारखे टी- शर्ट घालून तरूणाई रस्त्यावर उतरली आहे. कुठे भारताच्या विजयासाठी बॅटची पूजा केली जातेय. कुणी विजयासाठी सिद्धीविनायकाच्या चरणी साकडं घातलं आहे. तुमच्या शहरातील अपडेट जाणनू घ्या…
भारतीय संघाच्या विजयासाठी पुण्यात मनसेतर्फे दुग्धाभिषेक करण्यात आला. विश्वचषकात भारताने विजय मिळवावा यासाठी पुण्यात दुग्धाभिषेक करण्यात आला. मनसेतर्फे भारतीय संघाच्या खेळाडूंच्या कट आउटला दुग्धाभिषेक घालण्यात आला. दुग्धाभिषेक करत भारतीय टीमला पुण्यातून प्रोत्साहन देण्यात आलं. विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी या सगळ्यांच्या पोस्टर्सवर पुण्यात दुग्धाभिषेक घालण्यात आला. भारतीय संघाला पुण्यातून मनसेकडून अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या.
अहमदनगरमध्ये वर्ल्ड कप मॅच जिंकण्यासाठी नागरिकांनी घातले विठ्ठलाकडे साकडं घालण्यात आलं आहे. अहमदाबाद इथं आज होणाऱ्या फायनल सामना जिंकण्यासाठी विठ्ठलाची आरती करून प्रार्थना केली गेली. उपनगरातील सावेडी भागातील कजबे वस्तीवरील नागरिकांनी प्रार्थना केली. भारत हा सामना जिंकणार, असा विश्वास व्यक्त क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केला.यावेळी जीतेगा भाई जिथे का भारत जितेगा अशा घोषणा देण्यात आल्या.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप फायनल मॅच साठी सोलापुरातील क्रिकेटपटू एकवटले आहेत. सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियम मधील प्लेयर्स कडून टीम इंडियाला शुभेच्छा देण्यात येत आहेत. दहा वर्षापासून साठ वर्षापर्यंतचे प्लेयर्स एकत्र आले आहेत.
नागपुरातील क्रिकेट अकॅडमी मध्ये क्रिकेट प्रेमी आणि खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. टीमचा उत्साह वाढविण्यासाठी घोषणाबाजी करण्यात येत आहे. टीम इंडियाचा विजय निश्चित असल्याचं हे क्रिकेटप्रेमी म्हणात आहेत. नागपूर जिल्ह्यात विश्वकप फायनलचा फिव्हर पाहायला मिळतोय. भारतीय टीमच्या विजयासाठी क्रिकेटप्रेमींनी‘विजयी भव’ पूजा केली आहे. नागपूर बुटीबोरीत क्रिकेटर्सकडुन ‘विजयी भव’ पूजा करण्यात आली.
वर्ल्डकप फायनलमध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना होतोय. त्यासाठी नाशिकमध्ये क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. भारत संघाला चिअरअप करण्यासाठी क्रिकेटप्रेमी एकवटले आहेत. गोल्फ क्लब मैदानावर क्रिकेट प्रेमींचा उत्साह पाहायला मिळतोय. यावेळी इंडिया इंडियाचा जयघोष करण्यात येत आहे.
काही क्षणात भारतीय संघ विश्वचषक उंचावण्यासाठी ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी क्रिकेट प्रेमी उत्साहात आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये क्रिकेट प्रेमी पाटील मिसळच्या हॉटेल मालकाने अनोखी ऑफर ठेवलीय. अंतिम सामन्याचा दिवस असल्याने या हॉटेल मध्ये दोन मिसळ वर एक मिसळ फ्री ठेवण्यात आली. तर भारत जिंकणार असल्याचा विश्वास असल्याने त्यांनी उद्या एका मिसळ वर एक मिसळ फ्री ठेवली आहे.त्याचा क्रिकेटप्रेमी आस्वाद घेत आहेत.