एसटीच्या 44 हजार फेऱ्या, 152 लाख किमी प्रवास, लॉकडाऊनमध्ये ‘लालपरी’ची अखंड सेवा
औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती अशा सहा प्रदेशातून नागरिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत जाण्यासाठी, रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी एसटी महामंडळाने बसची सुविधा उपलब्ध करुन दिली. (Maharashtra ST Bus Migrants)
मुंबई : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील नागरिकांना आपापल्या घरी जाण्याची ओढ लागली होती. यासाठी रेल्वेप्रमाणेच एसटी बसेसही राज्याच्या चहुबाजूच्या सीमेपर्यंत धावल्या. एकूण 44 हजार 106 बस फेऱ्यांमधून 5 लाख 37 हजार 593 स्थलांतरीत नागरिकांना रेल्वे स्टेशन किंवा त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहचवण्यात आले. 31 मेपर्यंतच्या या अभियानात एसटी बसेसने तब्बल 152.42 लाख किमीचा प्रवास केला. (Maharashtra ST Bus helped 5 Lakh Migrants go home)
परराज्यातील नागरिकांना सुखरुप आपापल्या राज्यात परतता यावे यासाठी महामंडळाने बसेस उपलब्ध करुन दिल्या. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुखरुप त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन पोहोचवलं. त्यासाठी राज्य शासनाने 104.89 कोटी रुपयांचा खर्च केला.
औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती अशा सहा प्रदेशातून नागरिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत जाण्यासाठी, रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी एसटी महामंडळाने बसची सुविधा उपलब्ध करुन दिली.
दोन लाखाहून अधिक जणांना रेल्वे स्टेशनवर पोहोचवले
उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि आसाम, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, पंजाब, तामिळनाडू अशा विविध राज्यात रेल्वेने जाणाऱ्या मजूरांना रेल्वे स्टेशनपर्यंत सोडण्याचे काम एसटी महामंडळाच्या बसेसने केले.
दोन लाख 28 हजार 100 नागरिकांनी बसच्या या सुविधेचा लाभ घेतला. तीन लाखाहून अधिक लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडले. तर गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक राज्याच्या सीमेपर्यंत धावून एसटीने त्या राज्यातील लोकांना त्यांच्या राज्याच्या जवळ नेऊन पोहोचवले. या सुविधेचा 3 लाख 9 हजार 493 नागरिकांनी लाभ घेतला.
औरंगाबाद प्रदेशातून औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणीहून बस उपलब्ध करुन देण्यात आल्या. याप्रमाणेच मुंबई प्रदेशातून मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नागपूर प्रदेशातून भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, पुणे प्रदेशातून कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक प्रदेशातून अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, अमरावती विभागातून अमरावती, अकोला, बुलडाणा आणि यवतमाळ मधून बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या.
VIDEO : Mumbai Unlock | डोंबिवली- बसस्थानकात नोकरदारांची गर्दी https://t.co/DLQ1nHDMba
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 9, 2020
(Maharashtra ST Bus helped 5 Lakh Migrants go home)