एसटीतील ‘त्या’ अधिकाऱ्यांची बदली करा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एकाच मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करण्याचे निर्देश दिले आहेत.

एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बोलावलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासह एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
सध्या एसटी विभागातील अनेक अधिकारी हे एकाच मुख्यालयात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे त्यांचे काही ठराविक कर्मचाऱ्यांशी हितसंबंध निर्माण झाले आहेत. त्यातून ते इतर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात. याचा विपरीत परिणाम एस. टी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर होत आहे. त्यामुळे भविष्यात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी, या मागणीला प्रताप सरनाईक यांनी दुजोरा दिला आहे.
एसटी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी
याबाबतचा आढावा घेऊन एसटी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहे. यावेळी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. अधिवेशन संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देता येईल, असा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
संगमनेर बसस्थानक परिसरातील समस्या
दरम्यान संगमनेर बसस्थानक परिसरातील समस्या संदर्भात आमदार सत्यजित तांबे व अमोल खताळ यांच्या शिष्टमंडळासमवेत प्रताप सरनाईक यांनी चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी विस्तारित जागा देणे, नाशिक- पुणे महामार्गावरुन जाणाऱ्या बसेस संगमनेर बस स्थानकामध्ये थांबवणे इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.