हाता-तोंडाशी आलेला घास गेला, निसर्ग कोपला; राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, शेतकरी चिंतेत
गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे.
Maharashtra Unseasonal Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे लागवड केलेली किंवा काढणीला आलेली अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. फेंगल चक्रीवादळामुळे कोल्हापूर, सातारा, सांगलीत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात कडाक्याची थंडी पडली होती. मात्र आता तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा अलर्ट कमी झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पुन्हा कोरडे वातावरण तयार झाले आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांना येलो अलर्टही देण्यात आला आहे. तरसेच जालना ढगाळ वातावरण असून हवामान विभागाकडून जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी धुक्याची दाट चादर पसरल्यामुळे दृश्य मानता कमी झाली आहे. यामुळे रब्बी हंगामातल्या पिकांना धोका निर्माण झाला आहे.
तुरीसह कांद्याचे नुकसान
जालना जिल्ह्यात रिमझिम पाऊस देखील हजेरी लावत आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. त्यातच आता धुक्याची दाट चादर पसरल्यामुळे तूर, हरभरा, फळबागांसह आणि इतर पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण दिसत आहे. काही ठिकाणी अचानक पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळे तुरीसह कांदा रोपे व अन्य पिकांचे नुकसान होणार आहे.
त्यासोबतच नाशिकमध्ये ढगाळ वातावरण अवकाळी पावसानं द्राक्षं आणि कांदा उत्पादक संकटात आला आहे. फेंगल चक्रीवादळामुळे तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्याशिवाय काही ठिकाणी बे मोसमी पावसाचीही हजेरी पाहायला मिळत आहे. सततच्या वातावरण बदलामुळे कांद्याची रोपं खराब होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच द्राक्षांच्या बागांवरही याचा परिणाम होत आहे. सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने कांदा पिकांवर मावा ,तुडतुडे , पिवळेपणा अशा अनेक रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. तर द्राक्ष बागांवर देखील बुरी रोग वाढू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
पिकांवर कीड पडण्याची शक्यता
फेंगल चक्रीवादळाचा परिणाम उत्तर महाराष्ट्रात देखील जाणवू लागला आहे. धुळ्यात या चक्रीवादळामुळे गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरण पसरले आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका या पिकांवर कीड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.