महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम राहणार, गारठा वाढण्याचे कारण काय? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
महाराष्ट्रात नाशिक, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात थंडीचा जोर वाढला आहे. तसेच पुढील काही दिवस महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम राहणार आहे.
Maharashtra Whether Update : राज्यात सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. उत्तरेकडे थंड वाऱ्याचा प्रवाह वाढल्याने राज्यातील बहुतांश भागात गारठा वाढला आहे. काही भागात तापमान शून्य अंशाच्या खाली गेले आहे. तसेच दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नाशिक, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात थंडीचा जोर वाढला आहे. तसेच पुढील काही दिवस महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम राहणार आहे.
सध्या पुण्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. मात्र थंडी कायम राहणार आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने यंदाच्या हंगामात सपाट भूभागावर प्रथमच शून्य अंशाच्या खाली घसरला आहे. राज्यातही गारठा कायम असून धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यात निचांकी ६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे राज्यात गारठा कायम राहणार असला, तरी किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
लक्षद्वीप आणि मालदीव परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दक्षिण अंदमान समुद्रात आज चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होणार आहे. यामुळे सोमवारपर्यंत या भागात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. यातच पश्चिमी चक्रावात आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका अधिकच वाढला आहे. विशेष म्हणजे शनिवारी पंजाबच्या अदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या हंगामातील निचांकी उणे ०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड तालुक्यात कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. यामुळे नाशिकच्या निफाडमधील किमान तापमानाचा पारा घसरला आहे. यामुळे ओझर HAL येथे 6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 7.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नाशिकमधील निफाड तालुका थंडीमुळे गारठल्याने पुन्हा ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे दिसत आहे.
धुळ्यात तापमानाचा पारा घसरला
तसेच धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. धुळ्यात 4.4 अंश डिग्री सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. धुळ्यात महाबळेश्वरपेक्षा जास्त थंडी असल्याचे दिसत आहे. गेल्या आठवडाभरापासून धुळ्यात आठ अंश सेल्सिअसपेक्षा देखील कमी तापमानाची नोंद करण्यात आली होती. या हाड गोठवणाऱ्या थंडीमुळे धुळेकर गारठले आहेत.
धुळे जिल्ह्याचा तापमानाचा पारा हा चार अंशापर्यंत खाली आला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मात्र वाढलेल्या थंडीमुळे त्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होणार आहे. वाढलेली थंडी हरभरा आणि गहू या पिकांना फायदेशीर ठरणार असून शेतकऱ्यांकडून आता सरकारकडून दिवसा बारा तास वीज पुरवठा देण्याची मागणी होऊ लागली आहे. शेतातील विहिरीत असलेल्या पाणी वाढलेले थंडी आणि उत्तम वातावरण यामुळे रब्बीचा हंगाम चांगला जाईल. मात्र जर वेळेवर चांगला पिकांना पाणी दिले गेलं तरच त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे दिवसा 12 तास वीज मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
नंदुरबारमध्ये थंडीची लाट
तसेच नंदुरबारमधील सातपुड्यात थंडीची लाट पसरली आहे. नंदुरबारमध्ये तापमान हे 8 अंश सेल्सिअसच्या खाली उतरल्याचे पाहायला मिळत आहे. तोरणमाळ परिसरात वाढलेल्या थंडीचा परिणाम सर्वसामान्यांवरहोत आहे. सध्या नंदुरबारमध्ये थंडीसोबत दाट धुक्याची चादर पाहायला मिळत आहे.