लाडकी बहीण योजनेच्या प्रश्नात मनोज जरांगे पाटील यांची उडी; म्हणाले, भेदभाव आणि…
महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी सुरू केलेली लाडकी बहीण योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. निवडणुकीनंतर अर्जांची कडक छाननी सुरू असून अनेक महिलांना या योजनेचा लाभ नाकारला जात आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनीही या योजनेवरून सरकारला कानपिचक्या दिल्या आहेत.

महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेतून महिलांना 1500 रुपये दर महिन्याला दिले जात आहेत. निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सरसकट सर्वच महिलांना या योजनेचा लाभ दिला. मात्र, निवडणुका संपताच अर्जांची छाननी सुरू करण्यात आली आहे. ज्या महिला निकषात बसत नाहीत, त्यांचे अर्ज बाद करण्याचे काम सुरू आहेत. तसेच निकषात बसत नसाल तर अर्ज मागे घ्या, असं आवाहनही केलं जात आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. केवळ मते मिळावीत म्हणूनच महिलांना सरकारने योजनेचा लाभ दिल्याचा आरोप विरोधक करत आहेत. ही महिलांची फसवणूक असल्याचा दावाही विरोधक करत आहेत. आता या प्रश्नात मनोज जरांगे पाटील यांनीही उडी घेतली. त्यांनी सरकारला कंजुषी आणि भेदभाव करू नका, असा सल्ला दिला आहे.
मनोज जरांगे पाटील हे जालन्यातील अंतरवली सराटीत पुन्हा उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी त्यांचं उपोषण सुरू झालं असून आज त्यांचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारला कानपिचक्या दिल्या आहेत. बहिणींच्या मायेत सरकार दुरावा आणत आहे, त्यांच्यात भेदभाव आणि कंजूषी करू नका. टिळा लागेपर्यंत तुम्हाला सगळ्या बहिणी लागत होत्या. निवडून येताना सगळ्यांना पैसे द्यावे वाटत होते आणि आता पैसे परत घेण्याची तयारी सुरू केली आहे. लाडक्या बहिणीत सरकार जसे उघडे पडले, तसे आरक्षणात सरकारला उघडे पाडणार आहे, असा दावाच मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
तुमच्या सत्तेवर लोकं थुंकतील
आम्ही फक्त न्याय मागतोय. तुमचे मुंडके कापून मागत नाही. तुमचा बळी मागत नाही, आम्ही साधं आरक्षण मागतोय. तरीही देत नसाल तर ही गरिबांची थट्टा आहे. यांच्या सत्तेवर उद्या लोक थुंकतील, असा हल्लाबोलच मनोज जरांगे पाटील यांनी चढवला आहे.
सरकारकडून निरोप नाही
26 जानेवारीच्या सगळ्यांना शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा. सर्वांची प्रकृती आता ढासळत आहे. डॉक्टर तपासणी करत आहेत. अजून सरकारकडून कोणताही निरोप आलेला नाही. आम्ही सरकारच्या आशेवर नाही, यायचं नाही यायचं हा त्यांचा प्रश्न आहे, असं ते म्हणाले.
सरकार असून फायदा नाही
गोरगरीबांचे प्रश्न हे सरकार सोडवत नाही. जुलमी राजवट आडवी उभी कापून हे दिवस आणले. पण आयत्या गादीवर बसून सरकारकडून प्रश्न सुटत नाहीत. जनता प्रजासत्ताक झाली असूनही लढावं लागत आहे हे दुर्दैवी आहे. असलं सरकार असूनही काही फायदा नाही, असा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला.