राजपथावर यंदा भक्ती-शक्तीचा गजर, महाराष्ट्राच्या संत परंपरेचा चित्ररथ झळकणार
यंदा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात राजपथावर महाराष्ट्राच्या संत परंपरेचा इतिहास पाहायला मिळणार असल्याची माहिती मिळतेय.
नवी दिल्ली: दरवर्षी 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर दिमाखदार सोहळा पार पडतो. या सोहळ्यात भारतीयांसह संपूर्ण जगाला भारताच्या संरक्षण दलाच्या सामर्थ्याची झलक पाहायला मिळते. त्याचबरोबर विविध राज्यांचे चित्ररथही या संचलनात सहभागी होत असतात. त्यातून भारतातील विविध परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन होतं. यंदा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात राजपथावर महाराष्ट्राच्या संत परंपरेचा इतिहास पाहायला मिळणार असल्याची माहिती मिळतेय. (Maharashtra’s saint tradition will be seen on Rajpath on Republic Day)
कसा असेल यंदाचा चित्ररथ?
यंदा राजपथावर छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा फिरता देखावा साकारला जाणार आहे. या चित्ररथात तुकारामांची गाथा, संत साहित्याची महती पाहायला मिळणार आहे. अनेक वारकरीही या चित्ररथावर दिसणार आहेत. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत गोरोबा काका, संत जनाबाई यांचा देखावा यंदाच्या चित्ररथावर साकारला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
राजपथावरील महाराष्ट्राच्या चित्ररथांची परंपरा
प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथांची नेहमीच छाप पडली आहे. सुरुवातीची अनेक वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सहभागी झाला नव्हता. मात्र, नंतर महाराष्ट्राचा संचलनातील सहभाग लक्षणीय ठरला होता. 1980 मध्ये शिवराज्याभिषेक या महाराष्ट्राच्या चित्ररथाने पहिला क्रमांक मिळवला होता. त्यानंतर 1983 मध्ये बैलपोळ्याचा चित्ररथ अव्वल आला होता. 1993, 1994 आणि 1995 अशी सलग 3 वर्षे महाराष्ट्राच्या चित्ररथांनी राजपथावरील संचलनात बाजी मारली होती. त्यानंतर 2015 मध्ये पंढरीची वारी या महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला होता. तर 2018 मध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने बाजी मारली होती.
2020 मध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला स्थान नाही
मागील वर्षी राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सामील झाला नव्हता. 2020 च्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राने पाठवलेला प्रस्ताव नाकारण्यात आला होता. गेल्यावर्षीच्या संचलनासाठी मराठी रंगभूमीचती 175 वर्षे या थीमवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव केंद्राला दिला होता. पण तो नाकारण्यात आला. गेल्या वर्षी महाराष्ट्रासह पश्चिम बंगालच्या चित्ररथाचाही प्रस्ताव नाकारला होता.
संबंधित बातम्या:
प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला केंद्राने परवानगी नाकारली
महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारला, जे बेस्ट, त्यांनाच संधी : पियुष गोयल
Maharashtra’s saint tradition will be seen on Rajpath on Republic Day