छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना मानाचा महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर; पुण्यात 28 नोव्हेंबर रोजी गौरव
छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आपल्या कार्यकाळात समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ओबीसींची स्वतंत्र जनगणना सुरू करणारे देशातील छत्तीसगढ हे प्रथम राज्य आहे.
नाशिकः अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देण्यात येणारा मानाचा महात्मा फुले समता पुरस्कार यंदा छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरस्कार दिला जातो.
फुले वाडा येथे समारंभ
छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना येत्या 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता समता भूमी, फुले वाडा, पुणे येथील कार्यक्रमात या पुरस्काराने गौरवित करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, पुणे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, वैष्णवी सातव यांनी दिली. या सोहळ्यासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व राज्यभरातून समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
ओबीसींची जनगणना सुरू केली
छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आपल्या कार्यकाळात समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ओबीसींची स्वतंत्र जनगणना सुरू करणारे देशातील छत्तीसगढ हे प्रथम राज्य असून, त्याची यशस्वी अंमलबजावणी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडून केली जात आहे. त्यांनी राजकीय कार्यासोबत आपल्या कार्यातून महात्मा जोतीराव फुले यांचा सामाजिक वारसा विकसित केला. त्यांनी केलेल्या अलौकिक कार्याची दखल घेत त्यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येत आहे.
या दिग्गजांचा यापू्र्वी गौरव
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिनाच्या निमित्ताने महात्मा फुले समता पुरस्कार सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना देण्यात येतो. या अगोदर माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरदचंद्र पवार, माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली, खा. शरद यादव, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, ज्येष्ठ लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. बी. एल मुणगेकर, लेखिका अरुंधती रॉय, प्रा. डॉ. मा. गो. माळी, ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. तात्याराव लहाने, प्रा. हरी नरके यांच्यासह अनेक दिग्गजांचा समता पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे.
इतर बातम्याः
सार्वजनिक आरोग्य विभागाची 28 तारखेला पुन्हा परीक्षा; पुणे, नाशिक, लातूर, अकोला केंद्रावर होणार पेपर
नाशिककरांच्या सहनशीलतेचा अंत, मारेकऱ्यांना अटक करा म्हणत संतापलेले नागरिक रस्त्यावर!