Sanitary Napkin : एक रुपयात 10 सॅनिटरी नॅपकिन देणार, महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, 15 ऑगस्टपासून अंमलबजावणी
मासिक पाळीवेळी घेण्याची काळजी आणि सफाईतील कमतरता यामुळे जगभरातील 8 लाख महिलांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : राज्यातील दारिद्र्य रेषेखालील 60 लाख महिलांना 1 रुपया या नाममात्र किमतीमध्ये दरमहा 10 सॅनिटरी नॅपकिन (sanitary napkin) दिले जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या योजनेची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) हा मोठा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. 28 मे रोजी जागतिक मासिक पाळी दिनी (Menstrual Hygiene Day) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushirf) यांनी ही घोषणा केली आहे. मासिक पाळीवेळी घेण्याची काळजी आणि सफाईतील कमतरता यामुळे जगभरातील 8 लाख महिलांचा मृत्यू झाला आहे. स्त्रीयांच्या मृत्यूतील हे सर्वात मोठे पाचवे कारण आहे. भारतात 320 दशलक्ष मासिक पाळी होणाऱ्या स्त्रीयांपैकी केवळ 12 टक्के स्त्रीया सॅनिटरी नॅपकिन वापरतात. महाराष्ट्रात 66 टक्के स्त्रीया याचा वापर करतात, असंही मुश्रीफ यावेळी म्हणालेत.
केवळ 12 टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरतात
भारतात दरवर्षी 120 दशलक्षाहून अधिक महिलांना मासिक पाळीचा त्रास आणि आजारांचा सामना करावा लागतो. भारतात तीनशे वीस दशलक्ष मासिक पाळी होणाऱ्या महिला स्त्रियांपैकी केवळ 12 टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरतात असे आकड्यावरून समोर आले आहे. यामुळे देशात गर्भाशयाच्या कर्करोगामुळे झालेल्या 60,000 महिलांच्या मृत्यू पैकी दोन तृतीयांश मृत्यू मासिक पाळीती वैरसमजूतीमुळे झाला आहे. तर राज्याचा विचार केल्यास येथे केवळ 66 टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरतात. ज्यात शहरी भागाचे प्रमाण जास्त आहे. तर ग्रामिण भागात याचे प्रमाण कमी असून ते 17.30 टक्के आहे.
दारिद्र रेषेखालील 19 वर्षावरील सर्व महिलांसाठी योजना
राज्यात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेत फक्त 19 वर्षाखालील युवतींना सहा रुपयात सहा सॅनिटरी नॅपकिन्स देण्यात येत आहेत. त्यामुळे सध्या दारिद्र रेषेखालील मुलींना त्याचाल फायदा होत आहे. मात्र याचा लाभ महिलांना होताना दिसत नाही. त्यामुळे मुलींप्रमाणेच महिलांनाही या योजनेचा लाभ व्हावा सॅनिटरी नॅपकिन्स संदर्भात जागृकता यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ग्राम विकास विभागामार्फत दारिद्र्यरेषेखालील सर्व युवती, महिला आणि बचत गटांमधील महिलांना एक रुपये 10 सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार आहे. तर या योजनेसाठी 200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.