ठाकरेंचे निष्ठावंत नितीन देशमुख यांच्याविरोधात उभं राहण्यासाठी रस्सीखेच, महायुतीत जागा वाटपावरून वाद होण्याचे संकेत
अकोला जिल्ह्यातील जागावाटपाबाबत महायुतीत मतभेद आहेत. बाळापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा दावा आहे. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या विरुद्ध रामेश्वर पवळ (शिंदे गट) आणि संदीप पाटील (अजित पवार गट) यांचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जागावाटपातून महायुतीमध्ये मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
अकोला जिल्ह्यात महायुतीमध्ये अजूनही जागावाटपावर कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. अकोला जिल्ह्यात जागा वाटपावरून महायुतीत वाद होण्याची संकेत आहेत. कारण अकोला जिल्ह्यातील विधानसभेच्या 5 मतदारसंघापैकी चार जागांवर सध्या भाजपचे आमदार आहेत. तर बाळापूर विधानसभेत ठाकरे गटाचे नितीन देशमुख हे विद्यमान आमदार आहेत. पण भाजपने जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांवर दावा केला आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाने बाळापूरसह अकोट विधानसभा मतदारसंघाची मागणी केल्याने दोन्ही पक्षात जागा वाटप करून मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
बाळापूर विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी बाळापूर मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांनी पक्षाकडे बाळापुरातून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. तर यासोबतच पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पवळ यांना उमेदवारी देण्याची मागणी पक्षाकडे केली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचे राज्य समन्वयक असलेले नरेश मस्के खासदार झाले असताना दुसऱ्या राज्य समन्वयकाला शिंदे विधानसभेची उमेदवारी देणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र सध्याचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी मतदारसंघात कोणताही विकास केला नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल मतदार खूप नाराज आहे. त्याचा फायदा कुठेतरी आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे शिंदे साहेबांनी मला जर संधी दिली तर विजय निश्चितच आपला आहे, असं रामेश्वर पवळ म्हणाले आहेत.
कोण आहेत रामेश्वर पवळ?
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे ते राज्य समन्वयक आहेत. तर 1990 पासून राजकारणात सक्रिय आहेत. याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव आणि प्रदेश सरचिटणीस म्हणून काम केलं आहे. तर राष्ट्रवादीत असताना शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. तर राष्ट्रवादीत असतांना राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांना पक्षात आणण्याचं काम ही पवळ यांनी केलं आहे. त्यामुळे राजकारणामध्ये राजकीय पकड चांगली असल्याने बाळापूर मतदारसंघाची जबाबदारी मला द्यावी ही मागणी सध्या पवळ यांनी रेटून धरली आहे.
अजित पवार गटालाही हवा बाळापूर मतदारसंघ
दुसरीकडे अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी यांचे जवळचे मित्र असलेले संदीप पाटील यांनी बाळापूर विधानसभेवर दावा केला असून अमोल मिटकरी यांनीही बाळापूर विधानसभा आम्हालाच द्यावा ही मागणी रेटून धरली आहे. तर दुसरीकडे भाजपही या मतदारसंघावर आपला उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीत कोणाला सुटतो हे पाहणं ओत्सुक्याचं ठरणार आहे. पण या जागा वाटपावरून महायुतीमध्ये वाद होण्याचे संकेत सध्या पहायला मिळत आहे. कारण प्रत्येकाला बाळापुर मतदारसंघ हवा आहे. पण आता महायुती बाळापूर मतदारसंघावर काय भूमिका घेते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.