एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्विकारणार, महायुतीतील नेत्याची भविष्यवाणी
आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यातच आता महायुतीतील एका नेत्याने एकनाथ शिंदेंबद्दल एक महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे.
Maharashtra swearing-in ceremony : महाराष्ट्रात आजपासून ‘देवेंद्र पर्वा’ला सुरुवात होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील. देवेंद्र फडणवीसांसोबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यातच आता महायुतीतील एका नेत्याने एकनाथ शिंदेंबद्दल एक महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे.
महायुतीचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना नुकतंच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. तसेच यावेळी रामदास आठवले यांनी एका मंत्रिपदाची मागणी केली. यासोबतच त्यांनी संजय राऊतांनाही टोला लगावला.
“उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते, तर…”
“आमचे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत. त्यामुळे आम्ही परदेशातील लोकांना सुद्धा बोलवू. त्यामुळे संजय राऊत यांनी टीका करण्यापेक्षा त्यांच्या नेत्यांना सुद्धा उद्यासाठी बोलावलं आहे. उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते, तर त्यांचा मान-सन्मान आणखी वाढला असता. त्यांनी काँग्रेससोबत जाऊन मोठी चूक केली”, असे रामदास आठवले म्हणाले.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील
“मी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोललो आहे. यावेळी त्यांना एकनाथ शिंदे यांचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे, असे सांगितले आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील, असे शाहांनी मला सांगितले आहे. माझं याबद्दल शाहांशी बोलणं झालं आहे. यावेळी मी त्यांच्याकडे आम्हाला सुद्धा एक आमदार आणि मंत्रीपद हवं आहे, अशी मागणी केली आहे”, असे रामदास आठवले म्हणाले.
अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
दरम्यान काल भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला. यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी काल एकत्र राजभवनात दाखल होत सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर आज अखेर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यानुसार देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तर अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.