महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राज्यातील महायुती सरकारमधील जागावाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आली आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांचे सत्र गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुती एकसंध राहणार का ? हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज महायुतीच्या प्रमुख पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत घेण्यात आली. महायुतीच्या पत्रकार परिषदेसाठी भाजपकडून प्रसाद लाड, शिवसेनेकडून शंभुराज देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी खासदार आनंद परांजपे व शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.
फेक नरेटिव्हला फेक नरेटिव्हनेच उत्तर देणार असल्याचं शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री शंभूराज देसाई यांनी ठणकावून सांगितलं. आमच्यात कुठलीही रस्सीखेच नाही असंही त्यांनी जागावाटपाच्या मुद्यावर बोलताना स्पष्ट केलं.
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपापल्या पक्षांतर्गत बैठका झाल्या, महायुती म्हणून आम्ही एकत्रदेखील बैठका घेतल्या. सर्वप्रथम 288 मतदारसंघात महायुतीचे समन्वयक नेमण्यात आले आहेत. महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असावा यासाठी नेमणुका करण्यात आल्या आहेत.
महायुतीमध्ये पूर्णपणे समन्वय
महायुतीत संपूर्णत: समन्वय आहे. तिन्ही पक्षातील राज्यातील प्रमुखांना सर्व बाबतीत सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत,असे देसाई म्हणाले. तीन पक्षांचे प्रमुख नेते जो निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करणं, कुठेही रुसवेफुगवे राहणार नाहीत, कोणतीही नाराजी, , गैरसमज राहू नयेत याची जबाबदारी प्रत्येक पक्षानं आपापल्या मंत्र्यांवर, आमदारांवर आणि विधानसभा समन्वयकांवर देण्यात आली आहे, असं त्यांनी नमूद केलं. त्यांनी नमूद केले.
आमच्यात कुठलीही रस्सीखेच नाही
एखाद्या विधानसभा क्षेत्रात महायुतीमध्ये एका पक्षाकडं आहे, तिथे उमेदवारी मिळावी म्हणून महायुतीमधीलच दुसऱ्या पक्षाचे नेते इच्छक आहेत, माध्यमांमध्ये बऱ्याचदा अशा बातम्या येतात . पण उमेदवारी मागणं, इच्छा प्रदर्शित करणं हे लोकशाही जिवंत असल्याचं प्रतीक आहे.
म्हणून कोणी उमेदवारी मागितली, कोणी आग्रह केला म्हणून आमच्यात काही धूसफूस आहे, रस्सीखेच आहे, असं बिलकूल नाही. आमच्यात ( महायुती) पूर्णपणे समन्वय आहे, असं देसाई जागावाटपाच्या मुद्यावर बोलताना स्पष्ट केलं. आम्ही पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरणार आहोत, असेही ते म्हणाले.
फेक नरेटिव्हला फेक नरेटिव्हनेच उत्तर देणार
लोकसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी वेगळी होती. लोकसभा निवडणुकीत महायुतीबद्दल आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल प्रचंड गैरमज मतदारांच्या मनात निर्माण करून देण्यात आला. त्या गैरसमजाला, अपप्रचाराला, खोट्या प्रचाराला, त्या फेक नरेटिव्हला मतदार काही अंशी बळी पडले. पण हे वेळीच आमच्या लक्षात आलं.आता फेक नरेटिव्हला फेक नरेटिव्हनेच उत्तर देणार, असं आता संपूर्ण महायुतीनं ठरवलं आहे, असंही देसाई यांनी ठणकावून सांगितलं.