गिरणा धरणात अज्ञाताकडून विषप्रयोग, मोठ्या प्रमाणावर मासे मृत, दादा भुसेंकडून चौकशीचे आदेश
गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असताना काही समाजकंटकामार्फत त्या ठिकाणी विषारी द्रव्याचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे
मालेगाव : गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असताना काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी विषारी द्रव्याचा वापर केला आहे. यामुळे धरणातील मासळी मोठ्या प्रमाणात मृत पावल्या आहेत. (Malegaon girna dam poisoning)
सदर घटनेची माहिती मिळताच मनपा आयुक्त, उपमहापौर व इतर अधिकाऱ्यांनी धरणावर जाऊन पाहणी केली. विषप्रयोग केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात मालेगाव प्रकरणी मनपा तर्फे पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आलीये.
याच गिरणा धरणातून मालेगाव शहराला पाणीपुरवठा केला जातो. गिरणा धरण परिसरात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळल्याने रात्रीपासून मालेगाव शहरासाठी पाणीपुरवठा करणारे पंपींग स्टेशन खबरदारीचा उपाय म्हणून खंडीत करण्याचे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त दिपक कासार यांनी दिले आहेत. सध्या तळवाडे साठवण तलावातून मालेगाव शहराला पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आलीये.
कृषीमंत्री दादा भुसे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. तिथे मासेमारी करणाऱ्या ठेकेदारासोबतच कर्तव्यास असणाऱ्यांची चौकशी करण्याचे निर्देश दादा भुसे यांनी दिले आहेत.
धरणातील मृत मासळीच्या सेवनामुळे नागरिकांच्या जिवीतास धोका होवू शकतो. यामुळे धरणातील मृत मासळी खुल्या बाजारात विक्री होता कामा नये, यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ संबंधित ठेकेदारास ताब्यात घेवून मृत मासळी तात्काळ नष्ट करण्याचे आदेश दादा भुसे यांनी दिले. त्याचबरोबर धरणातून ज्या पाणीपुरवठा योजना राबविल्या जातात त्या पाणी तपासणी अहवाल प्राप्त होईपर्यंत थांबविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातून विविध भागात पाणी पुरवठा योजना राबविल्या जातात. धरणामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारीचा व्यवसाय देखील सुरू असतो. पारंपारीक पद्धतीने मासेमारी न करता मासेमारी सुकर होण्यासाठी काही समाजकंटक विविध प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया करत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु यामुळे नागरिकांच्या जीविताशी होणारा खेळ खपवून घेणार नाही. आजच्या प्रकाराची संपूर्ण चौकशीचे आदेश देण्यात आले असून दोषीवर कठोर कारवाई करून बंदोबस्त करणार असल्याचेही दादा भुसे म्हणाले.
(malegaon girna dam poisoning)