देव तारी त्याला..! अँब्युलन्समधून ज्याचा मृतदेह येणार होता तो स्वत:च्या पायानेच…
घरात अंत्यविधीची तयारी सुरू असताना, नातेवाईकांच्या डोळ्यातील अश्रूंना खळ नव्हता. कुटुंब शोकाकुल होतं, पण एकाएकी सगळं वातावरणच बदललं. त्याच्यामागणं कारणही तसंच होतं. ज्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती, तो माणूसच..
देव तारी त्याला कोण मारी ! ही म्हण आपण अनेक वेळा ऐकली असेल. पण या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव खचितच कोणाला आला असेल. पण कोल्हापूरमध्ये असाच एक प्रसंग घडला आहे जो ऐकून एखाद्याला वाटेल की हा तर कोणत्या तरी पिक्चरचा सीन आहे. पण नाही, हे खरंच आहे. घरात अंत्यविधीची तयारी सुरू असताना, नातेवाईकांच्या डोळ्यातील अश्रूंना खळ नव्हता. कुटुंब शोकाकुल होतं, पण एकाएकी सगळं वातावरणच बदललं. त्याच्यामागणं कारणही तसंच होतं. ज्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती, तो माणूसच जिवंत झाला, हालचाल करू लागला, एवढंच नव्हे तर स्वत:च्या पायानेच चालत घरी आला. हे ऐकून कोणाचाही विश्वास बसणार नाही खरा, पण हेच खरं आहे.
एखाद्या सिनेमामध्ये शोभेल अशी अतर्क्य, अनोख घटना घडली आहे कोल्हापूरमध्ये, तेथील कसबा बावडा या भागात. डॉक्टरांनी ज्यांना मृत घोषित केलं, तोच इसम पुन्हा जिवंत झाला आणि स्वत:च्या घरी परत आला तेही आपल्याच पायांनी चालत.
देवाचा जप करतानाच आला हृदयविकाराचा झटका
कोल्हापूरच्या कसबा बावडा परिसरात राहणारे, वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजेच पांडुरंग उलपे, हे 15 दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करत बसले होते, मात्र तेव्हाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांची परिस्थिती पाहून घरच्यांनी त्यांना लागलीच रुग्णालयात हवलं, तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचारही सुरू केले. मात्र थोड्या वेळाने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याने कुटुंबावर दु:खाचटा डोंगर कोसळला.
तात्यांच्या मृत्यूची बातमी समजताच घरीही आक्रोश झाला, हळूहळू त्यांचे सर्व नातेवाईक शेवटचा निरोप देण्यासाठी त्यांच्या घरी जमा झाले, काहीजण अंत्यविधीच तयारीही करू लागले. रुग्णालयातून तात्यांचे पार्थिव घरी घेऊन जाण्यास सुरूवात झाली खरी पण रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे अँब्युलन्सला चांगलाच दणका बसला. आणि तेवढ्यात जे घडलं ते पाहून आजूबाजूच्यांचे डोळेच विस्फारले , धक्का बसल्यानंतर, त्याच वेळी पांडुरंग तात्या यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली. ते पाहून सगळेच अवाक झाले, त्यांच्या नातेवाईकांनी पांडुरंग तात्या यांना पुन्हा रुग्णालयात नेले. थोड्या वेळापूर्वी डॉक्टरांनी ज्यांना मृत घोषित केलं, ते तात्या पुन्हा जिवंत झाले होते. तेच तात्या, अर्थात पांडुरंग उलपे तात्या आपल्या पायावर उभे राहून घराकडे चालत आले. ही सर्व पांडुरंगाचीच कृपा असल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे.