आता लय दिवस आनंद राहणार नाही, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
"उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत उपोषण सोडण्याबद्दल मराठा समाजाशी बोलून निर्णय घेणार आहे. पण आता उपोषण करणार नाही", असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
![आता लय दिवस आनंद राहणार नाही, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा आता लय दिवस आनंद राहणार नाही, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/11/Manoj-Jarange-Patil-on-Devendra-Fadnavis.jpg?w=1280)
Manoj Jarange Patil Attack On Government : “आता आमचे डोळे उघडले आहेत आणि मराठा समाजाचेही डोळे उघडले आहेत. खऱ्या आरक्षणाचा मारेकरी कोण हे आता सर्वांनाच माहिती झालं आहे. राज्य सरकार हे जाणूनबुजून काम करत नाही हे मराठा समाजाला कळलं आहे”, असा गंभीर आरोप मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंनी केला आहे. ते अंतरवाली सराटीत बोलत होते.
मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मी आज किंवा उद्या उपोषण सोडणार आहे, अशी मोठी घोषणा केली. “उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत उपोषण सोडण्याबद्दल मराठा समाजाशी बोलून निर्णय घेणार आहे. पण आता उपोषण करणार नाही”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा समाजाचा आरक्षणाचा मारेकरी कोण?
“मला इतके दिवस उपोषण करावे लागेल, हे अपेक्षित नव्हतं. देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांशी गद्दारी करतील, असे आम्हाला वाटलं नव्हतं. मी उपोषणाला बसलो आणि सिद्ध झालं की राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्याकडे लक्ष देत नाही. मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी होईल, असा आम्हाला वाटत होतं. परंतु लक्षात आलं की मराठ्यांना काही द्यायचं नाही. आम्ही सकाळी सांगितलं होतं की राज्य सरकारला आमच्या मागण्या मान्य करायचे की नाही हे बोललं पाहिजे होतं, परंतु ते काही बोलले नाही. त्यामुळे सिद्ध झालं आहे की मराठा समाजाचा आरक्षणाचा मारेकरी कोण आहे”, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
“फडणवीस साहेब लय दिवस आता तुमचा हा आनंद राहणार नाही. तुमच्या आनंदावर विरजण पडेल. ज्या दिवशी बोलायचं, त्या दिवशी तुम्हाला सांगेन. खरी चूक कोणाची आहे, हे मराठा समाजाला कळालं आहे. तुमचा आनंद लय दिवस राहणार नाही. आता आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू आणि आता वेगळ्या पद्धतीने आंदोलन करु”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
गद्दारी करतील असे स्वप्नात वाटले नव्हते
“बेईमानी आणि गद्दारी राज्य सरकारकडून होईल असे वाटले नव्हते. जे हक्काचे आहे ते आरक्षण देत नाहीत. आम्हाला उपोषण करायचे नव्हते. आम्हाला वाटले होते की दोन दिवसात मागण्या पूर्ण होतील. फडवणीस मात्र गप्प बसले. त्यातून त्यांना मराठा समाजाविषयी किती द्वेष आणि आकस आहे हे दिसून आले. देवेंद्र फडवणीस किती मराठा द्वेषी आहेत, ते उघडे पडले. फडणवीस गद्दारी करतील असे स्वप्नात वाटले नव्हते. फडवणीस यांनी मराठ्यांचे मने जिंकायला पाहिजे होते”, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.