Manoj Jarange Patil : मनोज जरांगेनी पुन्हा उपसलं उपोषणाचं अस्त्र, संतोष देशमुखांचा उल्लेख करत म्हणाले…
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरले असून आजपासून ते अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसले आहेत. समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासह इतर आठ मागण्यांसाठी ते उपोषण करत आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करतानाच त्यांनी सरकारला खणखणीत इशारा दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचं अस्त्र उगारलं आहे. ते आजपासून पुन्हा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. सग्या सोयाऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून त्याचा कायदा करा, दीड वर्षांपासून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरसकट कुणबीतून आरक्षण द्या, गॅझेट लागू करा, शिंदे समितीचं काम सुरू करा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, अशा त्यांच्या मागण्या असून ते आमरण उपोषण करणार आहेत. उपोषणाला सुरूवात करताना नोज जरांगे यांनी उपस्थितांना संबोधित करतानाच राज्य सरकारला थेट इशारा दिला. तसेच बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येचा उल्लेख करतानाच या उपोषणात त्यांनी पहिल्यांदाच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी केली.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?
उपोषणाला सुरूवात करतानाच मनोज जरांगे यांनी त्यांच्या मागण्यांचा पुनरुच्चार केला. सगेसोयऱ्यांना नोंदणी प्रमाणपत्र द्यायचं आहे. त्याचा आणि त्याच्या सगेसोयऱ्याचा एकच आहे. त्यांची पोटजात आणि व्यवसाय एक असल्याने त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्या. शिंदे साहेबांच्या समितीला तातडीने मुदतवाढ द्या. कक्ष सुरू केले होते, ते पुन्हा सुरू करा. शिंदे समितीला मनुष्यबळ द्या. भाषेचे अभ्यासक द्या. काही जातीयवादी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र दिलं नाही, ते प्रमाणपत्र द्या अशा मागण्या त्यांनी केल्या. या सर्व मागण्यांसाठी आम्ही पावणे दोन वर्षापासून झुंजतोय असेही मनोज जरांगे यांनी नमूद केलं.
आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत. सरकारने तसं आश्वासन दिलंय. हैदराबाद गॅझेट, सातारा, बॉम्बे, आणि औंध सरकारचं गॅझेट फडणवीस सरकारने ताबडतोब लागू करा. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांना निधी दिला नाही,ना त्यांना नोकरीत सामावून घेतलं. हे सर्व तातडीने करा. आम्ही 8 ते 9 मागण्या केल्या आहेत त्या सर्व जुन्याच आहेत, एकही नवीन मागणी नाही, त्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करा, असे जरांगे पाटील म्हणाले.
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या
या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष यांच्या हत्येचा उल्लेख केला. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली. त्यासाठीही आपल्याला लढायचं आहे असे सांगत जरांगे पाटील यांनी या उपोषणात पहिल्यांदाच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी केली. गुंडगिरीची साखळी मोडीत काढा. सोमनाथ सूर्यवंशींनाही न्याय द्या असे म्हणत संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींना न्याय देण्यासाठी आपल्याला लढायचं असल्याच जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या काय ?
- महाराष्ट्रातील मराठा समाज हा कुणबी आणि मराठा एकच आहे. म्हणून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.
- हैदराबाद गॅझेटिअर, सातारा संस्थान गॅझेटिअर, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियर लागू करून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी.
- न्यायमूर्ती शिंदे समितीने राज्यभर तातडीने कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू करावे. शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ द्यावी.
- सगे-सोयरे अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी. आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे सगे-सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी.
- महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस सरसकट सर्वांच्याच मागे घेण्यात याव्यात. सर्व गुन्हे रद्द करण्यात यावे.