वाल्मिक कराडप्रकरणी डॉक्टरांची चौकशी करा, पोलीस अधिकाऱ्याला सहआरोपी करा… मनोज जरांगे पाटील यांची सर्वात मोठी मागणी
मनोज जरांगे पाटील यांनी वाल्मिक कराडसंदर्भात प्रतिक्रिया देताना आता मोठी मागणी केली आहे. डॉक्टरांची चौकशी करण्यात यावी असं त्यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत, आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच वाल्मिक कराडसंदर्भात प्रतिक्रिया देताना मोठी मागणी केली आहे. मराठ्यांनी लढून अन्यायकारक राजवट उलटून टाकली, मात्र आम्हाला अजून हक्क मिळत नाही, जुलमी राजवटीत एवढा अन्याय झाला नाही तेवढा अन्याय या राज्यात सुरू आहे, तुम्ही आम्हाला आरक्षण दिल नाही, तर तुमचा मराठा द्वेष उघड होणार, तुम्ही मराठा विरोधी लोक आहात हे जाहीर होणार, मुख्यमंत्र्यांच्या मनात मराठ्यांच्या विरोधात राग असेल तर ते आरक्षण देणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी वाल्मिक कराडवर प्रतिक्रिया देताना मोठी मागणी केली आहे. त्याला काहीही झालेलं नाही, सत्तेचा वापर करून अधिकारी पाठवले जात आहेत. षडयंत्र सुरू आहे, दवाखान्यात नेऊन सोडण्याचं ऑपरेशन सुरू आहे. आता सरकारने एक काम करावे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर काढावेत, त्याच्या ड्रायव्हरचे सीडीआर काढा. तो दुसऱ्यांच्या फोनवरून बोलतो, गेवराई पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला चादरी नेऊन दिल्या. त्यांचीही चौकशी करा.
सगळया आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. सगळ्यांकडे भरपूर माहिती आहे, या पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करा, सरकारी डॉक्टरची देखील चौकशी करा, प्रकाश आबिटकर यांना विनंती आहे, कराड याचं दुखत नसताना देखील त्याचे डॉक्टर त्याचं दुखत असल्याचं सांगत आहेत. त्यांची चौकशी करा, त्याच दुखत नसताना त्याला दवाखान्यात का ठेवलं आहे? वाल्मीकला गुन्ह्यातून सोडण्यासाठी डॉक्टर आणि पोलीसांनी हे षडयंत्र केलं आहे का? असा सवाल यावेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरोपी सुटले तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, सर्वांची नार्को टेस्ट करा आणि केस अंडर ट्रायल चालवा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.