मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील राजकारणात प्रवेश करणार? पुन्हा दिला सरकारला इशारा
मराठा समाज प्रचंड संख्येने रस्त्यावर उभा आहे. समाजात वेदना आहे. मी सामान्य माणूस आहे. हे आंदोलन आता सामान्य माणसाने हाती घेतले आहे. समाजाला विरोध करून कुणी त्याला अंगावर घेणार नाही. सामान्य मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका मी बजावत आहे.
परभणी : 2 ऑक्टोबर 2023 | ओबीसी समाजाकडून आंदोलन करण्यात येतंय. त्यांनी त्याचे आंदोलन केलंच पाहिजे. त्याला आमचा विरोध नाही. ते काय आम्ही काय एकत्रच आहोत. पण त्यांना कुणी उचकवू नये. ते त्यांच्या हक्कासाठी भांडत आहेत आम्ही आमच्या हक्क्साठी भांडतोय. आरक्षण कुणाचेही असो आंदोलन केलं पाहिजे. तो घटनेने दिलेला अधिकार आहे. देशात, राज्यात आंदोलने चालू असतात. पण, राज्य शांत ठेवायचे आहे. एकमेकांच्या विरोधात जायचं नाही. सरकारला आम्ही चाळीस दिवस दिले आहेत. तोपर्यंत आम्ही काही बोलणार नाही. त्यांना त्याचं काम करू द्या. जे काही बोलायचं ते चाळीस दिवसांची मुदत संपल्यानंतर बोलेन असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.
आम्ही मराठा आरक्षण घेणारच आहोत. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने समिती नेमली. ती त्यासाठीच नेमली आहे. आमच्या आंदोलनानंतर ओबीसी समाजाचे आंदोलन सुरु झाले. त्यांना कोणता पक्ष चीथवतो, कोणता नेता चीथवतो यावर आता काही बोलायचे नाही. जे काही बोलेन ते चाळीस दिवसांनतर बोलेन असे ते म्हणाले.
सरकारने आमच्याकडून कळीस दिवसाचा वेळ घेतला. तो काही आम्ही दिलेला नाही. आम्ही त्यांची विनंती ऐकली. त्यामुळे आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. मराठा आरक्षण ही आमची वेदना आहे. लाखो लोक भेटायला येत आहेत. सरकारने समाजाची ही भावना लक्षात घ्यावी. वेदना कमी झाली पाहिजे. सरकार वेद्नाशुन्य नाही. पण, त्यांनी जागे होण्याची गरज आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने 14 तारखेपर्यंत आरक्षण जाहीर करणार असे सांगितले आहे. मी आशावादी आहे, ओबीसी आंदोलनाला माझा पाठिंबा आहे मात्र त्यांच्या मागण्याला माझा पाठिंबा नाही. ओबीसी, मुस्लिम, धनगर हा सर्व समाज आमच्यासोबत आहे. यावेळी आरक्षण मिळवून द्यायचंच आहे असे त्यांनी सांगितले.
नेता होणे ही आपली वाट नाही. आपली वाट एकच मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे. समाजाची पूर्वीपासूनची वेदना आहे. त्यामुळे हा लढा उभारला आहे. राजकारणात येण्याचा प्रश्नच नाही. ती आपली वाट नाही. राजकारणाचा विचार सध्या तरी नाही. सध्या विचार आहे तो फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.