मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पहिल्यांदाच गुन्हा दाखल, जरांगे म्हणाले, त्यांच्या मना…
नेते गुंडगिरी सांभाळत आहेत. सत्ता काबिज करण्यासाठी नेटवर्क चालवत आहेत. सरकारला हे रोखायचं नाही का? आम्ही गुंडांबद्दल बोललो, यांना काय लागलं? आम्ही गुंडाला बोललो तर बाकीच्या समाजाला लागण्याची गरज काय? यांना कोणती भाषा हवी? आमच्या बीड जिल्ह्यातील गुंडाराज संपलं पाहिजे, हे त्यांच्या समर्थकांनीच म्हटलं पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध पहिल्यांदाच बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने मनोज जरांगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जरांगे यांच्या विरोधात बीडमध्ये प्रचंड आंदोलन सुरू आहे. या सर्व मुद्द्यावर जरांगे यांनी भाष्य केलं आहे. मुंडे घराण्याच्या मनाविरुद्ध बीडमध्ये कधीच काही झालं नाही. पहिल्यांदाच या घराण्याच्या मनाविरुद्ध संतोष देशमुख हत्याकांडाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा राग म्हणूनच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा दावा करतानाच आंदोलन करणारे हे मुंडेंचे लाभार्थी आहेत, असा टोलाही मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. आरोपींना संतोष देशमुख यांचा खून पचवायचा होता, हे माझं मत आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो. पण आम्ही मस्साजोगला बसून गुन्हा दाखल करून घेतला. गुन्ह्यात आरोपींची नावे टाकून घेतली. हीच त्यांची खदखद होती. यांच्या मनाविरुद्ध आतापर्यंत बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. म्हणून यांची माझ्यावर जळजळ आहे. नाराजी आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
माझ्यावर नाराजी होतीच
बीडमध्ये त्यांनी गुंडगर्दीचं स्ट्राँग नेटवर्क तयार केलंय. मुंडे घराण्याच्या मनाविरुद्ध पोलीस ठाण्यात दाखल झालेली ही पहिली केस आहे. नाही तर हे सांगतील तसे गुन्हे दाखल होत होते. कुणालाही अटक होत नव्हती. यांना जसं नाचवायचं तसे नाचवत होते. कुणाची शाळा हडप, कुणाचा प्लॉट हडप, शेत हडप, कॉन्ट्रॅक्ट बळकव, असे प्रकार सर्रासपणे सुरू होते. पण आम्ही गुन्हा दाखल करून घेतला. त्यामुळे त्यांची आमच्यावर नाराजी होती. म्हणूनच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असा दावा मनोज जरांगे यांनी केला.
लाभार्थींचं आंदोलन
मुंडे घराण्याने स्वत:च्या हाताने त्यांची पत घसरवली आहे. त्यांचा सर्वांनाच त्रास होता. ठरावीक लोक इतरांना त्रास देत होते. जातीचा काही संबंध नव्हता. फक्त काही लोकं सर्वांना त्रास द्यायचे. आता माझ्या विरोधात जे आंदोलन करत आहेत ते या घराण्याचे लाभार्थी आहेत. या लोकांनी ओबीसींचं आरक्षणही खाल्लं आहे. तेच माझ्याविरोधात आंदोलन करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
त्यावर बोलायचं नाही? मस्ती अशीच चालू द्यायची?
त्या गावचा प्रमुख असणारा व्यक्ती घरातून गेला. गावाचा आणि कुटुंबाचा प्रमुख गेला. एका पक्षाचा प्रमुख माणूस गेला. म्हणजे तो सरकारचा घटक होता. गेला तर गेला. पण त्याचा तुम्ही खून केला. खून करून त्याच्या भावाला अरेरावी करणं सुरू आहे. त्यावर बोलायचं नाही? तुम्ही इतक्या क्रूरपणे खून केला, त्यावर बोलायचं नाही? आम्ही कोणता जातीवाद केला? दाखवा बरं? आजपर्यंत या राज्यातील एकाही जातीला मी दुखावलेलं नाही, नेते सोडून. नेते आमचे असो की तुमचे असो, ते कुणाचेच नसतात. त्यांना बोलायचं नाही? त्यांची मस्ती अशीच चालू द्यायची? त्यांना खून पाडू द्यायचे? धनंजय देशमुखचाही खून होऊ द्यायचा का? असा प्लान आहे का तुमचा? बोलायचं नाही का धनंजय देशमुखच्या बाजूने? आम्ही वंजारी, धनगर, आदिवासी, दलित, मुस्लिमांना कधीच काही बोलत नाही, असंही ते म्हणाले.
जरांगे, धस, दमानियांवर गुन्हा दाखल करा
दरम्यान, मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, अंजली दमानिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा या मागणीसाठी केज पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने मुंडे समर्थक एकत्र आले आहेत. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. पण दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात जरांगे यांच्यावर आधीच अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.