छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हायचंय; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा
आता कुणबी दाखल्यांचे पुरावे मिळत आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळणार आणि तेही ओबीसीत जाणार हे शंभर टक्के खरे असल्याने एकाचा तीळपापड झाला आहे. त्यांना जातीय तेढ निर्माण करायची आहे. सरकारने त्यांचे बोलायचे बंद करावे, त्यांना रोखावे, अन्यथा आमचा नाइलाज होईल, असा थेट इशारा मनोज जरांगे- पाटील यांनी नाव न घेता मंत्री छगन भुजबळ यांना दिला. ते कोल्हापुरात बोलत होते.
कोल्हापूर | 18 नोव्हेंबर 2023 : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल जालन्यातील सभेतून मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. आम्ही तुमचं खातोय का रे? असा सवाल करत ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, अशी गर्जनाच छगन भुजबळ यांनी केली होती. भुजबळ यांच्या या विधानानंतर जरांगे पाटील यांनीही पलटवार केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना जशास तसं उत्तर दिलं आहे. छगन भुजबळ यांचं वय झालंय. त्यामुळे ते काहीही बरळत आहेत. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, असा गौप्यस्फोट मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. कोल्हापूर येथे त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
मराठ्यांना आरक्षण मिळणार असल्याने काहींचा तिळपापड होत आहे. एकाला तर लईच वाट वाटतंय. पण मी घाबरणार नाही. मीही मराठ्यांचा पठ्ठ्या आहे. आपला दणका लय वाईट आहे. टप्प्यात आल्यावर कार्यक्रमच करत असतो. वयाच्या मानाने ते बरळत आहे. आजपर्यंत आम्ही त्यांच्या वयाचा आदर केला. आता तुम्ही पातळी सोडली. आम्ही ऐकून घेणार नाही. आम्ही तरी घरचं खातो. तुम्ही मराठ्यांचं रक्त प्यायलात. मराठ्यांचा तळतळाट लागला म्हणून तुम्हाला तुरुंगात बेसन भाकरी खायला लागली, असा हल्लाच मनोज जरांगे पाटील यांनी चढवला.
फडणवीस, अजितदादा काय करणार?
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो, त्यांना रोखा. नाही तर आम्हाला जशास तसं उत्तर द्यावं लागेल. आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं हे आम्हाला कळलंय. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर मग अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय करायचं? त्यांचं पण घेतो काढून घेतो की काय?, असा टोला त्यांनी लगावला.
मग चंद्रावर जा
काही जण म्हणतात आम्हाला कुणबी नको. पण कुणबी शब्दात एवढं काय वाईट आहे? कुणबीचा सुधारीत शब्द शेती आला. ज्याला कुणबीची लाज वाटते त्यांनी शेती विकून चंद्रावर जावं. तुम्हाला आंदोलनात यायच नसेल तर येऊ नका. पण गरीब मराठ्यांच्या अन्नात आता विष कालवू नका. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. या संधीच सोनं करा. विरोध करणाऱ्यांना विरोध करू द्या. त्यांना दुसरं काम राहिलं नाही, असंही ते म्हणाले.
त्यांना माझा झटका माहीत आहे
कितीही येऊ द्यात आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी ताकद मराठ्यात आहे. आरक्षण असलेले मराठे इतर मराठ्यांबरोबर आहेत. जात संपू द्यायची नाही. त्यांना राजकीय महत्वकांक्षा आहे. त्यासाठी ते दोन जातीत तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी फक्त त्याला आता महत्त्व देत नाही, त्याला माझा झटका माहीत आहे. शांतता बिघडून द्यायची नाही असा आमचा प्रयत्न आहे. त्यांनी कितीही बोर्ड फाडू द्या, असंही ते म्हणाले.