Manoj Jarange | भाजी, भाकरी, ठेचा, भात अन् गोड शिरा, कुणीही उपाशी राहणार नाही; मनोज जरांगे यांचा मुक्काम वाशी मार्केटमध्ये
maratha reservation | मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईत दाखल होणार आहे. त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी सरकारकडून विविध पातळीवर तयारी केली जात आहे. आज त्यांचा मुक्काम नवी मुंबईत असूनमराठा मोर्चेकऱ्यांसाठी एपीएमसी मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे.

गणेश थोरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, वाशी | 25 जानेवारी 2024 : मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालंच पाहिजे अशी मागणी करत गेल्या काही महिन्यांपासून अख्खा महाराष्ट्र ढवळून काढणारे मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या वेशीवर येऊन पोचले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आणि हजारो आंदोलक उद्यापासून मुंबईत आंदोलन करणार आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी अंतरवाली सराटीमधून पायी मोर्चा काढला असून चालत-चालत ते मुंबईच्या दिशेने निघाले. पुण्यात मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आजा ते नवी मुंबईत मुक्काम करणार असून उद्या मुंबईच्या दिशेने प्रस्थान करतील.
कुणीही उपाशी राहणार नाही, मोर्चेकऱ्यांसाठी मोठी सोय
नवी मुंबईील एपीएमसी मार्केट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चेकरी येणार असून त्यासाठी एपीएमसी मार्केटच्या वतीने जेवणाची सोय करण्यात आली आहे. सकाळपासूनच या ठिकाणी जेवण बनवले जात आहे. जेवणाबरोबर सकाळ आणि संध्याकाळच्या न्याहारीची सोय करण्यात आलेली आहे. एवढंच नव्हे तर जागोजागी पिण्याचं पाणी आणि चहाची देखील सोय करण्यात आली आहे. कुणीही उपाशी राहू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. मोर्चेकऱ्यांसाठी स्वयंपाक रांधण्यात आला असून जेवणामध्ये भाजी, चपाती, भाकरी बरोबर ठेचा ,भात आणि गोड शिरा देखील ठेवण्यात आलेला आहे. कोणालाही उपाशी पोटी जाता येणार नाही अशा प्रकारच्या जेवणाची सुविधा या ठिकाणी करण्यात आली आहे.
दोन दिवस एपीएमसी मार्केट राहणार बंद
मराठा आरक्षणा संदर्भात मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबई एपीएमसी मार्केट या ठिकाणी विराट सभा घेणार आहेत. त्यामुळे आज आणि उद्या (गुरूवार -शुक्रवार) एपीएमसी भाजीपाला मार्केट हे बंद ठेवण्यात आलेले आहे. या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. सध्या भाजीपाला या मार्केटमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम हाती घेत सॅनिटायझेशन देखील करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा स्वच्छता करत आहे.
मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ॲक्टिव्ह मोडवर
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ॲक्टिव्ह मोडवर आहेत. मोर्चात सहभागी होणाऱ्या मुंबईतील कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिस बजावली आहे. मुंबईतील जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. प्रत्यक्ष मोर्चात सहभाग झालेला जनसमुदाय, आयोजक तसेच मोर्चाला आर्थिक व इतर प्रकारे मदत करणार्या सर्वांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरणार , तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला.