‘आज साहेब मुख्यमंत्री पाहिजे होते, मग यांना…’; मनोज जरांगे पाटील मनातलं बोलले
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आम्ही सुरेश धस यांना खूप जीव लावला, माझ्या समाजाने त्यांना खूप जीव लावला, त्यांच्यावर खूप विश्वास होता. त्यांच्यावर जर पक्षाचा किवा सरकारचा दबाव होता, तर त्यांनी मीडियामध्ये यायला पाहिजे होतं, आणि या ठिकाणी जाहिरपणे येऊन सांगायला पाहिजे होतं, की मी मराठ्यांसोबत गद्दारी करणार नाही. जर तसं सांगितलं असतं तर पुन्हा त्यांना अपक्ष जरी उभा राहायचं काम पडलं असतं, तर त्यापेक्षाही जास्त मतदान पडलं असतं. पण त्यांना तिथे जायची गरजच नव्हती, पण ज्याचा त्याचा विषय असतो, मात्र आता हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी बालाजी तांदळे यांच्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. बालाजी तांदळे यांना माहीत होतं की आरोपी कुठे आहेत म्हणून. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एसपींना कलेक्टरांना आणि तपास यंत्रणेला स्पष्ट आदेश दिले पाहिजे. जो जो सीडीआरमध्ये आहे, रेकॉर्डिंगमध्ये आहे, त्यांना सह आरोपी करा, अशी मागणी यावेळी जरांगे पाटील यांनी केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात सुद्धा त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. तरच लोकांना वाटेल फडणवीस न्याय करतात. परंतु या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये काय आहे आणि काय नाही याचा आम्हाला मेळच नाही. या वेळेस शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे होते, तेव्हा यांना झपका कळाला असता, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली यावर देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. मी काल धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांसोबत चर्चा केली. सरकार आणि सरकारच्या दुटप्पी वागणुकीमुळे त्यांच्यावर खूपच दुर्दैवी वेळ आली आहे. सरकार खूप तिरस्कार करत आहे. संतोष देशमुख यांना न्याय द्यायची भूमिका सरकारची दिसत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.