शांत राहण्यासाठी आवाहन करतोय, पण…; मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात जरांगे पाटील कडाडले
Manoj Jarange Patil Sabha in Thane Statement About CM Eknath Shinde : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आव्हान दिलं आहे. ...तर आमच्यावर आणखी गुन्हे दाखल करा, असं म्हणत त्यांनी सरकारला आव्हान दिलंय. जरांगे पाटील आज ठाण्यात आहेत. तिथे बोलताना त्यांनी हे आव्हान दिलंय.
ठाणे | 21 नोव्हेंबर 2023 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात आहेत. ठाण्यातील गडकरी रंगायतनला मनोज जरांगे पाटील यांची सभा होत आहे. इथे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आव्हान दिलं आहे. महाराष्ट्र राज्यात शांतता राहावी म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल होत असतील तर आमच्यावर आणखी गुन्हे दाखल करा, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. मनोज जरांगे-पाटील हे आज ठाण्यात आहेत. ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात त्यांची जाहीर सभा होतेय. या सभेला मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. जरांगे ठाण्यात दाखल झाल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. 25 जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. यावेळी मराठा बांधवांनी बाईक रॅलीही काढली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले…
मराठा बांधव एकमेकांना अडी-अडचणीत मदत करतात. रात्री बेरात्री जरी काही अडचण आली तर आपण एकमेकांची मदत करतो. मात्र यांच्या राजकीय स्वार्थासाठी आपण आपल्यात वाद होऊ द्यायचे नाहीत. दंगली होऊ द्यायच्या नाहीत. हे आम्ही रात्रंदिवस सांगतो आहोत. पण ज्या लोकांनी कार्यक्रम घेतले. त्यांच्यावरच तुम्ही गुन्हे दाखल करत आहात. पण जरी तुम्ही गुन्हे दाखल केले. तरी आम्ही थांबणार आहोत का? राज्यात शांतता राहावी म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करताय. तर जरूर गुन्हे दाखल करा. ते गुन्हे आम्ही अंगावर घेऊ. लोकांना आम्ही शांततेचं आवाहन करतोय. हे आमचं चुकतंय का?, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगेंच्या सभेसाठी ठाण्यात तयारी
गडकरी रंगायत या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या सभेसाठी खास तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी मोठी जय्यत करण्यात आली आहे. ढोल, ताशे, पोवाडे आणण्यात आले आहेत. तसंच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताचे फलक या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. या सभेआधी कल्याणहून ठाणे शहरात दाखल होणाऱ्या पाटील यांचा भव्यदिव्य रोड शोही करण्यात आला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.