“धनंजय मुंडे शहाणा हो, मुख्यमंत्री साहेब आवरा त्यांना…”, मनोज जरांगे पाटील यांचा खरमरीत इशारा
आता मी थेट मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे, अजून बोललो नाही. तुमच्या सरकारमध्ये राहून याला जातीय तेढ निर्माण करायचा आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोप सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली. तसेच आरोपींना मदत करणाऱ्या सिद्धार्थ सोनावणे आणि डॉ. संभाजी वायभसे यांनाही अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना 18 जानेवारीपर्यंत म्हणजे 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणावरुन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी खरमरीत इशारा दिला आहे.
“धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला”
“आम्ही न्यायासाठी हे आंदोलन करत आहोत. एका लेकीन बाप गमावलाय. लेकीला न्याय पाहिजे. त्यामुळे राज्यभर समाज रस्त्यावर उतरला आहे. आता यातून सुट्टी नाही. धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शांत राहा शांत राहा असं सांगत जाणून-बुजून त्यांनी हे केले. संतोष देशमुखांचा खून खून करून त्यांचं पोट भरलं नसेल तरी लोक न्यायसाठी रस्त्यावर येणार आहेत”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“हा खून आमच्या जिव्हारी लागला”
“धनंजय मुंडे शहाणा हो. मुख्यमंत्री साहेब आवरा यांना नाहीतर आम्ही थांबणार नाही. धनंजय मुंडे आमचे लोकं तुला अडकवतील. ज्या मराठ्यांनी तुला वाचवलं, त्यावर तू पलटला. प्रति मोर्चे काढले तर आम्ही देखील तसंच उत्तर देऊ. आम्हीं देखील मोर्चाने उत्तर देवू. क्रूर हत्या केली. यांना नक्की राज्य कुठं न्यायचं आहे. राज्यभर मराठे मोर्चे काढू, हा खून आमच्या जिव्हारी लागला आहे. आता मी थेट मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे, अजून बोललो नाही. तुमच्या सरकारमध्ये राहून याला जातीय तेढ निर्माण करायचा आहे”, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
“आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत?”
“मुख्यमंत्र्याच्या शब्दावरती मराठे शांत आहेत. आम्हाला लोक खूप त्रास देत आहेत. एकही आरोपी सुटला तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना धोका दिला असा संदेश जाईल. त्यामुळे सर्वांना शिक्षा द्या. आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत. हे पळून आले आहेत. धनंजय मुंडेंनी हे सगळ थांबवावे. हाकेला मी कधीही विरोधक मानल नाही. मी त्यांच्या कुठल्याच जातीवर बोललो नाही”, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
“मनोरुग्ण आमदारांना मी बोलत नाही”
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आशिष जैस्वाला यांना टोला लगावला आहे. “तो दुसऱ्या पक्षात जाऊन आमदार झाला आहे. मराठ्यांच्या जीवावरच झालेला असणार, मी त्याला कधी बोललो ही नाही. मी असल्या मनोरुग्णांना बोलत नाही. मनोरुग्ण आमदारांना मी बोलत नाही. मी न्याय घेतल्याशिवाय हटणार नाही”, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.