Maratha Reservation | कुणाला बी भीत नाय… ना थंडी, ना वारा… जालन्यातून उसळलेली भगवी त्सुनामी अखेर आझाद मैदानावर धडकली
Maratha Reservation | मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपले आहेत. त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. मात्र आझाद मैदानात जाणारच अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यासाठी आझाद मैदानात जय्यत तयारीही करण्यात आली आहे.
मुंबई | 26 जानेवारी 2024 : एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मराठा आरक्षणासाठी गेल्या आठवड्याभरापासून पायी प्रवास करणारे मनोज जरांगे आणि हजारो आंदोलक हे मुंबईच्या वेशीवर पोहोचले आहेत. सध्या त्यांचा नवी मुंबईत मुक्काम असून थोड्याच वेळात ते मुंबईच्या दिशेने कूच करतील. मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. पण आज आझाद मैदानावर जाणारच अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केली.
त्याच पार्श्वभूमीवर आझाद मैदानातही जय्यत तयारी करण्यात आली आहे. कुणाला बी भीत नाय… ना थंडी, ना वारा… जालन्यातून उसळलेली भगवी त्सुनामी अखेर आझाद मैदानावर धडकली आहे. फक्त जालन्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातील ठिकठिकाणाहून, गावखेड्यातून मराठा बांधव हे आझाद मैदातानत यायला सुरूवात झाली आहे. सकाळी-सकाळीच हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक हे आझाद मैदानात उपस्थित आहेत. एक मराठा लाख मराठा, शांतता, संयम, संघर्ष = मराठा आरक्षण, घेतल्याशिवाय जाणारच नाही, अशा घोषणा देत मराठा आंदोलकांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी आझाद मैदानावरही तयारी पूर्ण होत आहे. अनेक आंदोलक हे स्वत:ची भाकरी स्वत: घेऊन आलेत. महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल हजारो आंदोलक आझाद मैदानात येताना स्वत:चं जेवण सोबत घेऊन आले आहेत. कोणी झुणका-भाकरी तर कोणी खर्डा-चपाती, अशी शिदोरी घेऊन आलं आहे. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता इथून हलणार नाही, अशीच भूमिका हजारो आंदोलकांची आहे.
वाशीमध्ये होणार मनोज जरांगेंची सभा
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने वाटचाल करतल असून शुक्रवारी पहाटे ते नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाले. या ठिकाणी जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. या सभेनंतर सभेनंतर ते मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. तसेच शिवाजी पार्कची परवानगी नाकारली आहे. आझाद मैदानाची क्षमता लक्षात घेऊन त्यांना परवानगी दिली नाही.
मुंबईमध्ये रोज ६० ते ७० लाख लोक नोकरीनिमित्त किंवा कामांनिमित्त लोकलने ये-जा करत असतात. यामुळे आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत आल्यास वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे. आझाद मैदानाची क्षमता पाच ते सहा हजारांची आहे. या ठिकाणी आंदोलकांसाठी सोयी, सुविधा नाहीत. मुंबईतील भौगौलिक परिस्थिती, लोकसंख्या, वाहनांची संख्या यामुळे मुंबईत अधिक भार शक्य होणार नाही. यामुळे मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनासाठी मुंबईतील खारघर येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्कची जागा दिली आहे.