तर जरांगे पाटील सरकारला आणखी वेळ देतील, आमदार बच्चू कडू यांचा नेमका दावा काय?
जरांगे पाटील याची शिंदे समितीने भेट घेतली. त्यांची भूमिका जाणून घेतली. त्या पाठोपाठ सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना भेटले. यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यतची मुदत दिली. तर सरकारने 2 जानेवारीची मुदत मागितली.
अमरावती | 5 नोव्हेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या उपोषण पुन्हा एकदा स्थगित केले. मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्या वेळी उपोषण सोडताना सरकारला चाळीस दिवसांची मुदत दिली होती. या काळात त्यांनी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात दौरे केले. 24 ऑक्टोंबरला सरकारला दिलेली मुदत संपली आणि 25 ऑक्टोंबरपासून ते पुन्हा उपोषणाला बसले. मात्र, यावेळी त्यांनी कोणत्याही नेत्याने, मंत्र्याने, आमदाराने भेटायला येऊ नये. आलात तर आरक्षणाचा जीआरच घेऊन या असा इशारा दिला होता. तर, मंत्री आमदार, नेते यांना गावबंदी करा असे आवाहन केले होते.
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा 25 ऑक्टोंबरपासून उपोषणाला सुरवात केली. मात्र, याच काळात मराठा आंदोलक हिंसक झाले. त्यांनी आमदार, नेते यांचा घरावर हल्ले केले. याची सर्वाधिक झळ ही बीड जिल्ह्याला बसली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलावली. ज्येष्ठ नेते शरद पवार, कॉंग्रेस, शिवसेना ( दोन्ही गट) नेते, अपक्ष आमदार आणि छोटे छोटे पक्षांचे नेते यांना या बैठकीला बोलावण्यात आले होते. या बैठकीत टिकाऊ आरक्षण द्यावे आणि जरांगे पाटील यांचे आंदोलन मागे घेण्यात यावे यावर एकमत झाले. तर आंदोलनाला जे हिसंक वळण लागले. नेत्यांच्या घरावर होणारे हल्ले आणि गावबंदी हा निर्णय योग्य नाही अशी भूमिकाही या बैठकीत काही नेत्यांनी घेतली.
सर्वपक्षीय बैठकीनंतर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हे उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तर, सरकारलाही खडे बोल सुनावले होते. दुसरीकडे जरांगे पाटील याची शिंदे समितीने भेट घेतली. त्यांची भूमिका जाणून घेतली. त्या पाठोपाठ सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना भेटले. यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यतची मुदत दिली. तर सरकारने 2 जानेवारीची मुदत मागितली.
आमदार बच्चू कडू यांनी मोठे विधान केलंय
या सर्व घडामोडीनंतर आमदार बच्चू कडू यांनी आता एक मोठे विधान केलंय. अजित दादा हे मुख्यमंत्री व्हावे असे त्यांच्या आईला वाटतं असेल तर त्यात गैर काय आहे? आईची इच्छा अशीच रहाणार असेल. पण, ते आता होतील की २०२४ मध्ये हे सांगता येत नाही असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होईल. पुढील निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे यात शंका नाही असेही ते म्हणाले.
सरकारने घाई करण्यापेक्षा केलेल्या कामाचा 15 दिवसांचा प्रगती अहवाल आधी मनोज जरांगे पाटील यांना दाखवावा. नंतर मनोज जरांगे यांच्याकडे तारीख वाढवून मागावी. त्यांना जर वाटलं की सरकारची प्रगती चांगली आहे तर ते सरकारला आणखी तारीख वाढवून देईल. जर वाटले की काम चांगले नाही तर तारीख वाढवून देणार नाही. उद्या सरकारी शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांची भेट होत आहे. त्या भेटीनंतर आणखी काही बाबी स्पष्ट होतील असेही आमदार बच्चू कडू म्हणाले.