Manoj Jarange Patil : निवडणूक लढणार नाही, मग उमेदवार पाडणार का?, मनोज जरांगे यांची नवी घोषणा काय?
आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा, निवडणूक न लढवण्याचा निर्णय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. निवडणूक लढवणार नाही, पण मग निवडणुकीतील उमेदवार पाडणार का ? यासंदर्भातही मनोज जरांगे यांनी भाष्य केलं आहे. त्यांची नवी घोषणा काय आहे ? वाचा सविस्तर..
विधानसभा निवडणुकीच्या मतादानासाठी आता अवघे 16 दिवस उरले आहेत. येत्या 20 तारखेला राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी अविरत आंदोलन करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधनासभा निवडणुकीतन माघार घेण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. एका जातीवर कस निवडून यायचं, त्यामुळे नाईलाज आहे एकटयाने कसं लढायचं. यावर रात्री आमची चर्चा झाली. यादी न आल्यामुळे नाईलाजाने एका जातीवर जिंकणे शक्य नाही त्यामुळे थांबून घेतलेलं बरं राहील, असं सांगत जरांगे यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. मात्र असं असलं तरी निवडणूक लढवणार नसतील तर उमेदवार पाडणार का ? याबाबतही जरांगे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
मी कोणालाही पाडा म्हणत नाही आणि निवडून आणा हे पण सांगणार नाही. याला पाड आणि त्याला पाड, माझी ईच्छा नाही. मात्र जर कुणी माझ्या आंदोलनात आलं तर मात्र मी कार्यक्रम करणार. मराठा समाजाचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. घरा घरातला एक मराठा करोडो आहेत, निवडणूक प्रक्रियेत असलो तरी नसलो तरी खेळ खाल्लास, सुट्टी नाही. ही आमची माघार नाही तर गनिमि कावा आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले. आंदोलन सुरूच राहणार, ते थांबणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
काय म्हणाले जरांगे पाटील ?
काल दिवसभर मतदारसंघानुसार सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली. मतदारसंघ सुद्धा ठरले, काही कमी तर काही वाढले असतील. मराठा समाजाने मतदानावर लढायचं आहे. आमच्या मित्र पक्षाची आणखी यादी आली नाही
यादीच नाही म्हणल्यावर लढायचं जमेल का? एका जातीवर कस निवडून यायचं, त्यामुळे नाईलाज आहे एकटयाने कस लढायचं, यावर रात्री आमची चर्चा झाली. यादी न आल्यामुळे नाईलाजाने एका जातीवर जिंकणे शक्य नाही त्यामुळे थांबण्याचा निर्णय घेतला.
कोणालाही पाठिंबा नाही
आम्ही माघार घेतलेली नाही. हा गनिमी कावा आहे. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज मागे घ्यावेत. महाविकासआघाडी असो किंवा महायुती असो, दोन्हीकडचे नेते सारखेच आहेत. त्यामुळे कोणाला पाठिंबा देणार नाही. तसेच कोणालाही निवडून आणा, असे देखील सांगणार नाही. आपण कुणाच्याही प्रचाराला, सभेला जायचं नाही, मतदान करायचं आणि मोकळ व्हायचं. गुपचुप जायचं, मतदान करायचं आणि पडायचं म्हणत नाही. केवळ माझे आंदोलन सुरु राहणार असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
एकाच जातीवर जिंकण शक्य नाही
माझ्यावर महायुती किंवा मविआ, कोणाचाही दबाव आला नाही. मी माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही, मी बदलत नाही, आम्हाला निवडून यायचं होतं. पण निवडून येऊन संपवण्यापेक्षा पाडून संपवू. निवडणुकीचा जेव्हा जेव्हा विषय आला तेव्हा सांगितलं एका जातीवर निवडून नाही लढता येत. एका जातीवरून कोणीही निवडून येऊ शकत नाही. माझं एवढं राजकीय आकलन आहे. राजकीय प्रक्रिया वेगळी आहे, इथं मताची गोळबेरीज करावी लागते . राजकारणाची प्रक्रिया वेगळी आणि आंदोलनाची वेगळी असते, तिथे ( राजकारणात) लोकांची गोळाबरीज करावी लागते, असं त्यांनी नमूद केलं.