अजितदादांना राज्यात मोठा झटका बसणार?, ते आमदार आमच्या… अनिल देशमुख यांच्या विधानाने खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठी अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. याचा पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी केलेल्या एका विधानामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. काय आहे त्यांच वक्तव्य... जाणून घ्या.
लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालात महाराष्ट्रात महायुतीला मोठा झटका बसला आहे. भाजपची तर पिछेहाट झालीच पण सुनील तटकरे वगळता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एकाही उमेदवाराला राज्यात निवडणुकीत यश मिळालेलं नाही. त्यांना अवघ्या एका जागेवर विजय मिळाल आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठी अस्वस्थता पसरल्याचे वृत्त आहे. काल राष्ट्ववादी अजित पवार गटाच्या आमदारांची तातडीची मुंबईत बैठक झाली. मात्र या बैठकीहल नवाब मलिक, राजेंद्र शिंगणे, नरहरी झिरवळ, धर्मराव बाबा अत्रामस सुनील टिंगरे , अण्णा बनसोडे हे सहा जण अनुपस्थित होते. हे सर्वजण गैरहजर का होते, याचे कारण कळवण्यात आले असले तरी यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केलेल्या एका विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवार गटाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. लोकसभा निकालानंतर शरद पवार, जयंत पाटील, माझ्या संपर्कात अनेक तरुण उमेदवार आहेत. दादा गटाचे अनेक आमदार संपर्कात आहेत, ते फोन करतात. 15-20 दिवसांत काय होतं ते बघा. लोकसभेचा निकाल आल्यानंतर दादा गटाच्या अनेक आमदारांना आपल्या भविष्याची चिंता वाटू लागली आहे, असा दावा – शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. विधानसभा लढवायची आहे. ते आपलं भविष्य बघतात. कोण्या पक्षासोबत फायदा यासाठी आमदारांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत, असे ते म्हणाले.
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक नाही
बारामतीत जो निकाल लागला तो आश्चर्यकारक नाही. पवार कुटुंबात फूट पाडून त्यांच्याच घरातील उमेदवार द्यायचा. आणि पवार साहेब यांना बारामतीत अडकवून ठेवण्याचा भाजपकडून प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी केला. मात्र लोकसभा निवडणुकीप्रमाणेच येत्या विधानसभा निवडणूकीतंही महाराष्ट्रात चमत्कार घडणार, असा विश्वास दावा त्यांनी केला. या विधानसभ निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच येईल. विधानसभेसाठी आम्ही तयारी सुरू केली आहे.