अनेक जण आमच्या संपर्कात, पण आमच्याकडे आता जागा नाही… भाजप नेत्याने स्पष्टच सांगितलं
ज्यांच्या चौकशा सुरु आहेत त्यांची चौकशी आपल्या जागेवर राहील. पण, ते जेव्हा तुमच्यासोबत होते तेव्हा असे प्रश्न तुम्हाला का आले नाही? तुम्हाला सोडून गेल्याबरोबर तुमचे प्रश्न यायला लागले.
नागपूर : शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचे असे कधीही ठरले नव्हते. शिवसेना भाजप युतीच्या एवढ्या जाहीर सभा झाल्या. त्या सर्व जाहीर सभेचे व्हिडिओ आहेत. विश्वगौरव नरेंद्र मोदीजी यांच्या सभेत त्यांनी वारंवार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असेच सांगितले. मात्र, राष्ट्रवादीसोबत यांची बैठक झाली आणि शरद पवार यांनी त्यांना सांगितलं की भाजपच्या कमी जागा आहे तर तुम्ही मुख्यमंत्री पदाची मागणी करा आणि तेच त्यांनी केलं. त्याचा फायदा उद्धवजीनी घेतला. निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या 120 च्या वर जागा येणार नाही हे लक्षात आलं. त्यानंतर त्यांच्या मनात बेइमानी सुरू झाली अशी टीका मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
त्या चर्चेदरम्यान अमित भाई आणि चार भिंती यांच्याशिवाय कुणीच नव्हते. अमित भाईंनी एकदा नाही तर अनेकदा सांगितलं की आम्ही कुठलाही शब्द दिला नाही. अशी सवय राजकीय क्षेत्रात लागली तर इतर राज्यातसुद्धा तेच होईल. हे लोकशाहीला धरून असू शकत नाही. आम्ही जिथे शब्द अगोदर दिला तिथे आम्ही शब्द पाळला.
ज्यांनी पस्तीस पस्तीस वर्ष रक्ताचे पाणी केले. शिवसेनेचा झेंडा हाती घेतला ते तुम्हाला टाटा बाय-बाय करून गेले. एकनाथ शिंदे चाळीस आमदारांना घेऊन निघून गेले. याला भाजप नाही तर तुमचा स्वभाव दोषी आहे. तुमचा स्वभाव तसा आहे म्हणून तुमच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही असे मुनगंटीवार म्हणाले.
नीलम ताई गोऱ्हे यांनीही तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. अनेक जण अजूनही आमच्या संपर्कात आहे. पण, आमच्याकडे आता जागा नाही. आम्ही कुणालाही घेत नाही आणि त्यांच्यासोबत राहायला कुणी तयार नाही अशी परिस्थिती आहे.
ज्यांच्या चौकशा सुरु आहेत त्यांची चौकशी आपल्या जागेवर राहील. पण, ते जेव्हा तुमच्यासोबत होते तेव्हा असे प्रश्न तुम्हाला का आले नाही? तुम्हाला सोडून गेल्याबरोबर तुमचे प्रश्न यायला लागले. आधी तुमच्या चौकशीचा विचार करा मग विचार कसा असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.
नरेंद्र मोदी देशाचा गौरव वाढवत आहेत. तर, राहुल गांधी बाहेर देशात जाऊन देशाची निंदा करतात. अशी निंदा करण्याचा अधिकार तुम्हाला दिला नाही. या देशातील देशभक्तांनी प्राणाची आहुती देऊन तिरंगा आमच्या हाती दिला आहे. त्यात यांचे व्यक्तिगत योगदान नाही. त्यामुळे देशाची बदनामी करण्याचा यांना कोणी अधिकार दिला?
देशाच्या पंतप्रधानाबद्दल नीच शब्दात बोलायचं. देशाच्या उन्नतीच्या प्रगतीबद्दल चर्चा करायची नाही. विकासाच्या गोष्टी ते करत नाही. त्यामुळे त्यांच्यापासून देशाच्या प्रत्येक व्यक्तीने सावध राहण्याची गरज आहे अशी टीका त्यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.
शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये आजपर्यंत अनेक भ्रष्टाचार झाले. शरद पवार यांच्याबद्दल काही विधान नाही. भाजपमध्ये आपला तुपला किंवा तुझा माझा या भावनेने काम होत नाही. आणि जो चूक असेल त्याला क्षमा नाही असे त्यांनी स्पष्ट केले.