अनिल केऱ्हाळे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, जळगाव : वादग्रस्त पोलीस अधिकारी किरणकुमार बकाले (Kirankumar Bakale) यांच्यावर अटकेची कारवाई होत नसल्याने जळगाव येथील सकल मराठा समाजाच्या (Maratha Community) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला (Chain hunger strike) सुरुवात करण्यात आली आहे. मराठा समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून संपूर्ण राज्यात तीव्र निषेध नोंदवला जात होता. बडतर्फ करून अटकेच्या कारवाईची मागणी केली जात होती. मात्र, त्याच दरम्यान पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही बकाले यांना अटक न झाल्याने सकल मराठा समाजाच्या संघटनांनी साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत पोलीस अधिक्षक आणि जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालसमोर आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
संपूर्ण राज्यात वादग्रस्त पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी केलेल्या विधानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने ऐकली होती.
त्यावरून संपूर्ण राज्यात बकाले यांच्यावर कारवाईची मागणी झाली होती, बकाले यांचे निलंबनही झाले होते, आयपीएस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी केली जाईल असेही जाहीर झाले होते.
मात्र, त्यानंतर बकाले यांच्या संदर्भात कुठलीही कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे याबाबत पुरावे गहाळ झाल्याची देखील माहिती समोर येत आहे.
एकूणच ही सगळी परिस्थिती पाहता बकाले यांना कुणी पाठीशी घालतंय का ? अशी चर्चा जळगावसह संपूर्ण राज्यात सुरू झाली आहे.
त्यामुळे बकाले यांच्यावर कठोर कारवाई व्हावी याकरिता सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला जळगाव येथील कार्यालयासमोर सुरुवात करण्यात आली आहे.
विविध मराठा संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला असून बकाले यांच्यावर कारवाईसाठी दबाव टाकला जात आहे.
त्यामुळे बकाले यांच्यावर येत्या काळात अटकेची कारवाई होते का ? बकाले यांना पाठीशी घालणारे कुणी आहेत का ? बकाले यांच्यासंदर्भातील पुरावे कुणी गहाळ केले ? या प्रश्नांची जळगाव पोलीसांना द्यावी लागणार आहे.
बकाले यांच्या वादग्रस्त विधानाला महिना उलटला आहे. मुख्यमंत्री जळगाव दौऱ्यावर मराठा समाजाच्या संघटना त्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या असताना आठ दिवसांत कारवाईचे आश्वासन दिले होते.
मात्र, आता मुख्यमंत्री यांनी आश्वासन देऊन अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही का ? की या घटनेचा मुख्यमंत्र्यांनाच विसर पडला ? अशी चर्चा जळगावमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.