मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मराठा पॅटर्न, काय झाली घोषणा ?
निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली असता आता दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाने ठाण्यात मराठा पॅटर्न राबविण्याचा इशारा दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला सरकारने वाटाण्याच्या अक्षदा लावल्याने मराठा समाजात नाराजी आहे. या नाराजीचा फटका सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येणार आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी दसऱ्याला नारायण गडावर आपल्या पुढील रणनीतीची घोषणा करणार आहेत.त्यातच आता ठाण्यात येत्या विधानसभा निवडणूकीत मराठा समाजाची ताकद दाखविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने मराठा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा समाजाला सगेसोयरे अध्यादेश लागू करावा, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे आणि कुणबी म्हणून प्रमाणपत्रे मिळविण्यास मदत करावी अशा मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरु केले आहे. त्यातच येत्या दसऱ्याला नारायण गडावर मनोज जरांगे पाटील मेळावा घेणार आहेत. त्यावेळी ते आपल्या पुढील रणनीतीची घोषणा करणार आहेत.आता मराठा समाज निवडणूकीच्या माध्यमातून एकजूट दाखविणार आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील आता आपले उमेदवार उभे करणार की नाही याविषयी उत्सुकता असताना ठाण्यात मात्र मराठा क्रांती मोर्चाने मराठा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्व पक्षांना कोंडीत पकडणार
मराठा समाजाबाबत सर्वच राजकीय पक्षांची उदासिनता पाहता मराठा एकजुटीची ताकद दाखविण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकी़त मराठा क्रांती मोर्चाने “मराठा पॅटर्न”राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ठाण्यातील चारही विधानसभा क्षेत्रात आगामी एक महिना “मराठा जोडो अभियान” राबवणार असल्याची माहिती ठाणे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ॲड. संतोष सुर्यराव आणि प्रविण पिसाळ यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.तसेच वेळ पडल्यास ठाण्यातील चारही विधानसभा जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. त्यामुळे ठाणे विधान सभा क्षेत्रात भाजपचे आमदार संजय केळकर, कोपरी- पाचपाखडी मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,ओवळा माजीवडा आमदार प्रताप सरनाईक या महायुतीच्या नेत्यांसह महाविकास आघाडीला देखील कोंडीत पकडण्याचे काम आता मराठा समाजाने सुरु केले आहे.