दादा म्हणाले, 50 टक्के केस संपली, मराठा आरक्षणाचं गुपित फोडलं!
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला 1 डिसेंबरला जल्लोष करा असा शब्द दिला होता. त्यानुसार भाजप-शिवसेना सरकारने दोन्ही सभागृहात विधेयक मांडलं, ते मंजूर झाल्यानंतर त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली. आजपासून शासन निर्णय जारी झाला आणि मराठा आरक्षण लागू झालं. या सर्व प्रक्रियेत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एक […]
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला 1 डिसेंबरला जल्लोष करा असा शब्द दिला होता. त्यानुसार भाजप-शिवसेना सरकारने दोन्ही सभागृहात विधेयक मांडलं, ते मंजूर झाल्यानंतर त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली. आजपासून शासन निर्णय जारी झाला आणि मराठा आरक्षण लागू झालं. या सर्व प्रक्रियेत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एक डिसेंबरला आरक्षण कायदा कसा अंमलात आला, याबाबतचं गुपित सांगितलं.
“एक डिसेंबरची पहाट उजडायच्या अगोदर रात्रभर प्रिंटिंग करुन, मराठा आरक्षणाचा कायदा अंमलात आणला. हे काम भाजपने राजकीय अजेंड्यापेक्षा निष्ठेने केले”, असं चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात सांगितले. हे आरक्षण न्यायालयात 100 टक्के टिकणारे असून, त्यासाठीसुद्धा खूप पूर्वतयारी केल्याचे त्यांनी सांगितलं.
राज्यात आरक्षणाची असाधारण स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे 50 टक्केच्यावर आरक्षण गेले तरी ते कायदेशीर असल्याचे मांडण्यासाठी, वकिलांची फौज उभी केली जाईल असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
“मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यासाठी पूर्वतयारी खूप केली आहे. 50 टक्के केस संपते असं माझं मत आहे. कारण आधी कोर्टाने म्हटलं होतं की मराठा समाज मागास आहे हे मागास आयोगाने म्हणायला हवं. नारायण राणे ही समिती होती. त्यामुळे आम्ही मागास आयोग नेमला, त्यांनी 1040 पानी रिपोर्ट दिला. हा रिपोर्ट सगळे वकील मांडतील. त्यामुळे माझं असं मत आहे, की ज्यावेळी मागास आयोग मराठा समाजाला मागास म्हणतो, त्यावेळी मराठा समाज मागास कसा, या प्रश्नाचं उत्तर मिळतं, आणि इथे केस संपते. आता 50 टक्केच्या वर आरक्षण का? ही केस उरते. तर घटनेमध्ये कुठेही 50 टक्केच्या वर आरक्षण देऊ नये असा उल्लेख नाही. ज्या सुप्रीम कोर्टाच्या केसचा दाखला दिला जातो, त्या केसमध्येच खाली लिहिलं आहे, 50 टक्केवर आरक्षण देता येईल, जर त्या राज्यामध्ये असाधारण स्थिती निर्माण झाली तर. त्यामुळे 32 टक्केवर समाज मागास झाल्यामुळे असाधारण स्थिती निर्माण झाली, त्यामुळे आरक्षण दिलं. याबाबतचा युक्तीवाद वकील कोर्टात मांडतील. न्यायालयाने मराठा समाज मागास कसा याबाबत चिकित्सा केली तर वकील ते रिपोर्टद्वारे सिद्ध करतील “.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी इतर समाजाच्या आरक्षणासाठीसुद्धा सरकार सकारात्मक असल्याचे नमूद केलं. मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या चंद्रकांत पाटील यांचे कोल्हापुरी फेटा बांधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
मराठा आरक्षण लागू
दरम्यान, आजपासून मराठा आरक्षण लागू झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 डिसेंबरला जल्लोष करा असं मराठा समाजाला सांगितलं होतं. त्यानुसार सरकारने मराठा आरक्षण लागू केलं. मराठा आरक्षणाचा शासन आदेश आज जारी झाला. आजपासून नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेशात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण असेल.