Maratha Reservation | मनोज जरांगेच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू, सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

| Updated on: Jan 25, 2024 | 12:04 PM

लोणावळ्यामध्ये मनोज जरांगे यांच्या मनधरणीचे प्रयत्न आता सुरू झाले आहे. सरकारचं एक शिष्टमंडळ मनोज जरांगेशी चर्चा करण्यासाठी तेथे पोहोचलं असून एका बंद खोलीत त्यांची चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे यांच्याशी ऑनलाइन संवाद साधण्याची शक्यता आहे.

Maratha Reservation | मनोज जरांगेच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू,  सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
Follow us on

लोणावळा | 25 जानेवारी 2024 : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही असणारे मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलक मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. पुण्यात मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर मनोज जरांगेसह असंख्य आंदोलक नवी मुंबईच्या दिशेने निघाले असून सध्या ते लोणावळ्यात आहेत. उद्या ते मुंबईत धडकणार असून त्यांच्या आंदोलनाला सुरूवात होणार आहे. मात्र मराठ्यांचं हे वादळ मुंबईत धडकण्यापूर्वीच रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

लोणावळ्यामध्ये मनोज जरांगे यांच्या मनधरणीचे प्रयत्न आता सुरू झाले आहे. सरकारचं एक शिष्टमंडळ मनोज जरांगेशी चर्चा करण्यासाठी तेथे पोहोचलं असून एका बंद खोलीत त्यांची चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे यांच्याशी ऑनलाइन संवाद साधण्याची शक्यता आहे.

सरकारचं शिष्टमंडळ भेटीला

गेल्या तासाभरापासून संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांची मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांच्याकडून मनोज जरांगे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारीही आहेत. मनोज जरांगे यांचा मोर्चा अजूनतरी लोणावळ्यातच मुक्कामस्थळी आहे. आज जरांगे पाटील यांचा मोर्चा नवी मुंबईत धडकणार होता, मात्र अजूनही त्यांचा लोणावळ्यातच मुक्काम आहे. तेथेच प्रशासनाकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

मुंबईत मोर्चा आल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो

हा मोर्चा मुंबईत आला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती काही जणांनी व्यक्त केली होती. त्यामुळे मनोज जरांगे यांचा मोर्चा थांबवण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. त्याचसाठी सरकारचे शिष्टमंडळ पुढे आले असून लोणावळ्यातच त्यांनी जरांगे यांची भेट घेतली आहे. गरज पडल्यास स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगे पाटील यांच्याशी ऑनलाइन संवाद साधतील. जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये यावं, सरकारशी बोलावं, चर्चा करावी पण आंदोलन करू नये अशी भूमिका सरकारने घेतली आहे.

हा मोर्चा काढू नये असं वारंवार आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं होतं पण आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. जोपर्यंत सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असा पवित्राच जरांगे यांनी घेतला आहे. त्याप्रमाणे गेल्या आठवड्यातच अंतरवली सराटी येथून त्यांचा पायी मोर्चा निघाला असून काल पुण्यात त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला.

त्यामुळे आता सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात यशस्वी ठरेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जर हा प्रयत्न यशस्वी झाला नाही तर हे शिष्ट मंडळ मनोज जरांगे यांचा आणि सध्या दरे गावात असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट व्हीसीद्वारे संवाद साधून देतील. आता मनोज जरांगे पाटील मुंबईत येतील की थांबतील याचीही सर्वांनाच उत्सुकता आहे.