मुंबई (गिरीश गायकवाड) : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापलाय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले आहेत. यावरुन बरेच तर्क-वितर्क लढवले जातायत. आता राज्य सरकारमधील मंत्री शंभूराजे देसाई यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला का गेलेत? त्या बद्दल माहिती दिलीय. “राज्यात अनेक प्रश्न असतात, त्याची चर्चा करण्यासाठी सीएम एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले असतील. राज्यातले अनेक प्रश्न केंद्राशी निगडित असतात. माझी काही सीएम आणि डीसीएम यांच्याशी याबाबत चर्चा झाली नाहीये” असं शंभूराजे देसाई म्हणाले. “मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितले होते, की मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल” असं शंभूराजे देसाई म्हणाले.
“मराठा आरक्षण आमच्या सरकारला द्यायचे आहे. पण कोणाच्याही सरकारमध्ये सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकले नाही. आम्हाला आरक्षण द्यायचे आहे, आणि टिकणारे आरक्षण द्यायचे आहे म्हणून क्यूरेटिव पिटीशन दिली आहे. मराठा समाजात अनेक प्रश्न आहेत, ते सर्व क्यूरेटिव पिटीशन मध्ये टाकले आहेत. ऊसतोड कामगार मराठा आहे. अनेक अल्पभूधारक मराठा आहेत. 100 पैकी 90 % मराठा गरीब आहे.. केवळ 10-12 टक्के सदन मराठा असतील” असं शंभूराजे देसाई म्हणाले.
मराठा तरुणांवरील आंदोलनातील गुन्हे मागे घ्यायला वेळ का लागतोय?
“जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे, त्यावर आम्ही ठाम आहोत. जेव्हा दोन व्यक्तींमधील वादाचा गुन्हा असतो, ते मागे घेणे सोपे असते. पण जेव्हा आंदोलनातील, मोर्चामध्ये गुन्हे दाखल झाले असतील तर तो फौजदारी गुन्हा असतो. त्यात तक्रार करणारा हा स्वतः पोलीस किंवा सरकारी अधिकारी असतो, अशा केसमध्ये गुन्हा मागे घेणे तितके सोपे नसते, त्याला एक कायदेशीर प्रक्रिया असते त्याला वेळ लागतो” असं शंभूराजे देसाई म्हणाले.
जरांगे पाटील यांना काय आवाहन केलं?
“आता जर आम्ही घाई घाईत आरक्षण दिले तर ते परत सुप्रीम कोर्टात टिकणार नाही, आणि हातात जी क्यूरेटिव पिटीशनची संधी आहे ती संधी पण निघून जाईल. समिती काम करत आहे. टिकणारे आरक्षण कसे देता येईल त्यासाठी सर्व मोठ्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली की मराठा समाजाला आरक्षण देणार. माझी जरांगे पाटील यांना विनंती आहे की, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या” असं शभुराजे देसाई म्हणाले.