Maratha Reservation : चेहऱ्यावर हास्य, रस्त्यावर फुगडी आणि घोषणाबाजी.. मराठा बांधवाचा आनंदोत्सव
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधव गेल्या पाच महिन्यांपासून लढा देत असले तरी तो तेवढ्यापुरताच मर्यादित नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी होत असून त्यासाठी अविरत प्रयत्न सुरू होते. अखेर आज राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्याचे अध्यादेशही काढण्यात आले.
नवी मुंबई | 27 जानेवारी 2024 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधव गेल्या पाच महिन्यांपासून लढा देत असले तरी तो तेवढ्यापुरताच मर्यादित नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी होत असून त्यासाठी अविरत प्रयत्न सुरू होते. अखेर आज राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्याचे अध्यादेशही काढण्यात आले आहे. मध्यरात्री २ वाजता पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांनी ही घोषणा करताच सर्वांच्या चेहऱ्यावर जे हास्य फुलले, त्याला तोड नाही. मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला. मनोज जरांगे यांच्या घोषणनेनंतरच मराठा समाजाच्या आनंदाला उधाण आलं असून एकच जल्लोष सुरू आहे.
मनोज जरांगे पाटील आणि हजारो मराठा आंदोलकांचा सध्या वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये मुक्काम असून तिथलं वातावरण उत्साहाने भारलेलं आहे. सर्व मागण्या मान्य झाल्याचे समजताच आंदोलकांनी एकच जल्लोष केला. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील हे उपोषण सोडणार असून विराट सभाही घेणार आहेत. सभेठिकाणी जेसीबीतून फुलांची पुष्पवृष्टीदेखील करण्यात येणार आहे
रस्त्यावर आंदोलकांनी घातली फुगडी
या आंदोलनासाठी आपलं सर्वस्व झोकून देणाऱ्या मराठा बांधवाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला आहे. मराठा आंदोलनाला यश मिळताच आंदोलकांच्या चेहऱ्यावर एकच हसू फुललं. कोणी रस्त्यावर फुगडी घालून आनंद व्यक्त करू लागले, तर काहींनी भगवा फडकावत, जोरदार घोषणा देत आनंद व्यक्त केला. इतक्या महिन्यांच्या मेहनतीला आज यश मिळालं असून त्याचा निर्भेळ आनंद सर्वच आंदोलकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. वाशीतील मार्केटमध्ये भगवी लाट उसळली असून एक मराठास, लाख मराठा या गोषणांनी हा परिसर दुमदुमून निघाला आहे. तर काही ठिकाणी चक्क ढोलाच्या तालावर ठेका धरत आंदोलकांनी आनंद व्यक्त केला.
मराठा समाजाचा ऐतिहासिक विजय
आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने मराठा समाजाचा ऐतिहासिक विजय झाले आहे, अशी प्रतिक्रिया एका आंदोलकाने व्यक्त केली. ७० वर्षांपासून मराठा समाज आरक्षणापासून वचिंत होता, अनेक वेळा त्यासाठी लढा दिला पण शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यावर आरक्षण हुलकावणी द्यायचं. पण आज मनोज जरांगे दादांसारखा प्रामाणिक नेता मराठा बांधवाना भेटला आणि त्यांच्या अथक प्रयत्नांनी आम्हाला आरक्षण मिळवून दिलं. आज हा आमच्या जीवनातील सर्वात महत्वाचा क्षण आहे, अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या. मराठे शांततेत सुद्धा युद्ध जिंकू शकतात, हे दाखवून दिलं, असंही ते म्हणाले.