शशिकांत शिंदे मराठा आहेत का? नरेंद्र पाटलांचा सवाल, शिंदेंचही चोख प्रत्युत्तर
आमदार शशिकांत शिंदे आणि आण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याच जोरदार वाक् युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं.
सातारा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यानंतर राज्यात जोरदार राजकारण सुरु आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमधील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशावेळी आमदार शशिकांत शिंदे आणि आण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याच जोरदार वाक् युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं. (Allegations between MLA Shashikant Shinde and Narendra Patil)
नरेंद्र पाटलांची शिंदेंवर टीका
मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. त्यानंतर साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दोन युवकांनी हल्ला केला आणि तोडफोड केली. त्याचा जाब विचारण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे हे त्या दोन युवकांच्या घरी पोहोचले आणि त्यांना इशारा दिला. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आज नरेंद्र पाटील साताऱ्यात दाखल झाले. पाटील यांनी शिंदे यांच्यावर सडकून टीका करत, शशिकांत शिंदे हे नक्की मराठा आहेत का? असा सवाल केलाय. तसंच ज्या तरुणांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड केली त्यांच्या मागे एक समाज म्हणून खंबीरपणे उभा असल्याचंही पाटील म्हणाले. तसंच शिंदे यांनी केलेल्या दमबाजी प्रकरणी सातारच्या पोलिसांनी गुन्हा दाखल करावा आणि त्या तरुणांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी पाटील यांनी केलीय.
शशिकांत शिंदे यांचं प्रत्युत्तर
नरेंद्र पाटील यांनी केलेल्या टीकेला आमदार शशिकांत शिंदे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पाटील यांच्या टीकेला आपण महत्व देत नाही. मी कुणालाही दम दिला नाही. तर समजावून सांगण्यासाठी गेलो होते. मी मराठा आहे हे मलाही माहिती आहे आणि समाजातील सर्व नेत्यांनाही माहिती आहे, अशा शब्दात आमदार शिंदे यांनी नरेंद्र पाटील यांना उत्तर दिलं.
साताऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी दगड फेक केल्याची घटना समोर आली आहे. कारमधून आलेल्या व्यक्तीं दगडफेक करुन फरार झाल्या आहेत. सातारा पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपच्या काही मंडळींनी हे कृत्य केल्याचा आरोप केला आहे.
भाजपची काही मंडळी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तो प्रकार सातारामध्ये झाला. साताऱ्यात काही व्यक्ती आल्या त्यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि राज्यमंत्र्यांच्या घराबाहेर दगडफेक केली. ही नावं पोलिसांना कळालेली आहेत. त्या व्यक्ती कोणत्या पक्षाचं काम करतात, कोणत्या संघाचं काम करतात, कोणत्या आमदाराचं काम करतात हे सुद्धा कळलेलं आहे. माझी पोलिसांनी आरोपींना 24 तासात अटक करावी, ही विनंती आहे. आम्ही जशास तसं उत्तर देऊ शकतो. खालच्या पातळीवर राजकारण केलं जातेय हे दुर्दैव आहे.
संबंधित बातम्या :
लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, रस्त्यातच आडवा; खासदार उदयनराजे आक्रमक
मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांना भेटू: अजित पवार
Allegations between MLA Shashikant Shinde and Narendra Patil