मुंबई, ३ सप्टेंबर २०२३ : राज्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती. अखेर आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसांच पुनरागम झालंय. येत्या ७२ तासात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भाला एलो अलर्ट देण्यात आलाय. पुण्याच्या इंदापूर परिसरात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गोंदियामध्येही दीर्घ कालावीनंतर पावसाचे आगमन झाले. काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. चंद्रपूर जिल्ह्यातली पावसाचं पुनरागमन झालं. एका महिन्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी सुखावला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. उन्हाळ्यासारखे तापमान अनुभवणा-या चंद्रपूरवासियांना पावसाच्या पुनरागमनामुळे दिलासा मिळाला आहे. रात्र आणि दिवसा दोन्ही सुमारे 42 ते 43 डिग्री तापमानाने नागरिक त्रस्त झाले होते. विजांचा गडगडाट आणि मुसळधार पावसाने चंद्रपुरात पुन्हा एकदा गारवा अनुभवायला मिळाला आहे. जिल्ह्यात जेमतेम 50 टक्के एवढाच वार्षिक सरासरी पाऊस झालाय. जिल्ह्यात गेले 25 दिवसापासून जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा होती. सोयाबीन, कापूस आणि धान पिके सुकत चालली असताना या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे.
गोंदिया जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारली होती. गोंदियामध्ये आज दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालं. अचानक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या धान पिकांना जीवनदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी सुद्धा सुखावलेला आहे. पावसावर अवलंबित असणाऱ्या शेतीला या पावसाच्या मोठा फायदा होणार आहे.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज इंदापूर तालुक्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने राज्याच्या काही भागांमध्ये हजेरी लावली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. या पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. मागील दोन आठवड्यांपासून पावसाने दांडी मारली होती. पिकांना दमदार पावसाची अपेक्षा आहे.
गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने आज पावसाचे संकेत दिले होते, ते खरे ठरले. या पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. आज आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण आहे. शहर आणि परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील कासेगाव, टाकळी बोहाळी, वाखरी, गावात जोरदार पाऊस पडला.