स्फोटांच्या भयंकर आवाजांनी झोपेतून खडबडून जागे झाले, बदलापूरकरांच्या काळजात धस्स, कापरासारखी कंपनी पेटली
बदलापूरच्या एका केमिकल कंपनीत भीषण आग लागून एका कामगाराचा मृत्यू झाला तर चार ते पाच जण जखमी झाले आहे. बदलापूरमधील खरवई एमआयडीसी येथील व्हीके केमिकल कंपनीत गुरूवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली

बदलापूर | 18 जानेवारी 2024 : बदलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बदलापूरच्या एका केमिकल कंपनीत भीषण आग लागून एका कामगाराचा मृत्यू झाला तर चार ते पाच जण जखमी झाले आहे. बदलापूरमधील खरवई एमआयडीसी येथील व्हीके केमिकल कंपनीत गुरूवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आणि तेथेच मोठे स्फोट होऊन तीन ते चार किलोमीटर परिसरात असणाऱ्या इमारतींना मोठे हादरे बसले. आगीची माहिती मिळताच थोड्याच वेळात अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बऱ्याच प्रयत्नांती त्यांना आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळालं.
या केमिकल कंपनीला आग लागल्याने बाहेर असणाऱ्या दोन टेम्पोमधील केमिकलमध्ये प्रथम आग लागली त्यानंतर ही आग कंपनीमध्ये पसरली अशी माहिती तेथील कामगारांनी दिली. या भीषण आगीमुळे चार ते पाच कामगार गंभीर जखमी झाले. तर एका कामगाराचा दुर्दैवाने मृत्यू झाला. या आगीमुळे झालेल्या स्फोटाचा आवाज पाच किलोमीटरपर्यंत आला. लोकांच्या अक्षरश: कानठळ्या बसल्या. त्या स्फोटाने संपूर्ण शहर हादरलं.
आगीचे वृत्त मिळताच बदलापूर, अंबरनाथ,अंबरनाथ आनंद नगर, एमआयडीसी धील अग्निशमन गाड्या दाखल झाल्या आणि बऱ्याच वेळाने त्यांनी आग विझवली. आता कुलिंगचे काम चालू आहे.