MHADA Exam | स्पर्धा परीक्षांचा गोंधळ मिटता मिटेना ! म्हाडा आणि एमपीएससीची एकाच दिवशी परीक्षा
स्पर्धा परीक्षांचा घोळ काही मिटता मिटत नाहीये. नव्या माहितीनुसार आता राज्यात 29 जानेवारी या एकाच दिवशी म्हाडा आणि एमपीएससीची परीक्षा होणार आहे. पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर म्हाडाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पुणे : स्पर्धा परीक्षांचा घोळ काही मिटता मिटत नाहीये. नव्या माहितीनुसार आता राज्यात 29 जानेवारी या एकाच दिवशी म्हाडा आणि एमपीएससीची परीक्षा होणार आहे. पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर म्हाडाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता ही परीक्षा 29 जानेवारी रोजी होणार असली तरी याच दिवशी एमपीएससीची परीक्षादेखील आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मुद्दा नवी डोकेदुखी ठरु लागला आहे.
राज्यभरात 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारीदरम्यान म्हाडाची परीक्षा
मिळालेल्या माहितीनुसार एमपीएससीच्या पोलीस निरिक्षक पदासाठी येत्या 29 जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र याच दिवशी आता म्हाडाची लांबवण्यात आलेली परीक्षादेखील घेतली जाईल. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जाणार आहेत. यामुळे आता राज्यातील विद्यार्थी गोंधळात पडला आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्यामुळे तारखा जाहीर करताना इतर विभागाचं वेळापत्रक लक्षात घेतलं जातं नाही, असा आरोप केला जातोय. राज्यभरात 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारीदरम्यान म्हाडाची परीक्षा होत आहे. पेपर फुटल्याचे आरोप झाल्यामुळे म्हाडाची 12 ते 20 डिसेंबर 2021 दरम्यान होणारी परीक्षा रद्द करण्यात आली होती.
एमपीएससीने वेळापत्रक आधीच जाहीर केलं होतं
दरम्यान, एमपीएससीने आपल्या परीक्षेचं वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केलं होतं. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी तयारीदेखील केली आहे. 29 जानेवारी रोजी एमपीएससीची पीएसआय मुख्य परीक्षा होत आहे. आता याच दिवशी म्हाडाच्याही परीक्षेचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे.
565 जागांसाठी परीक्षा, तक्रारींमुळे परीक्षा रद्द
राज्यात 12 डिसेंबर रोजी म्हाडाच्या 565 जागांसाठी परीक्षा होणार होती. मात्र परीक्षेपूर्वीच पेपर फुटल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. तशी काही उदाहरणेदेखील समोर आली होती. त्यानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली होती. याच वेळी परीक्षेची नवी तारीख जाहीर करु असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र आता एमपीएससी आणि म्हाडाचे पेपर एकाद दिवशी होणार असल्यामुळे मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या :