Lockdown : राज्यातील दूध विक्रीला लाखो लिटरचा फटका
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉक डाऊन घोषित (Milk sale decrease due to corona) केला.
कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉक डाऊन घोषित (Milk sale decrease due to corona) केला. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता देशातील सार्वजनिक वाहतूक, दुकानं आणि कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे याचा मोठा फटका आता दुग्ध व्यवसायाला बसत आहे. दुधाची आवक फारशी घटली नसली तरी दूध विक्रीत मात्र लाखो लिटरचा फटका दूध संस्थांना (Milk sale decrease due to corona) बसत आहे.
राज्यात संचारबंदीमुळे मोठ्या शहरातील हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या बंद असल्याने दुधाची विक्री कमालीची घटली आहे. तर दुग्धजन्य पदार्थांची ही हीच अवस्था आहे. अत्यावश्यक सेवेमुळे दुधाची आवक होण्यावर फारसा परिणाम झाला नसला तरी एकीकडे दूध विक्री नाही तर दुसरीकडे कोरोनाच्या भीतीने कामगार येत नसल्याने दुधाच्या पॅकिंगवर परिणाम अशा विचित्र परिस्थितीला दूध संघांना सामोर जावे लागत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा दूध संघ म्हणून ओळख असलेल्या गोकुळच्या दूध विक्रीत एक लाख लिटरची घट झाली आहे.
विक्रीतील घट सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला कच्चामाल देखील मिळणं मुश्किल झाला आहे. त्यामुळे या दूध संघाची अवस्था आणखीनच बिकट होत आहे. येत्या काळात ही परिस्थिती आणखीनच भीषण होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळेच दुधाची आवक, विक्री तसेच दुग्धजन्य पदार्थांसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या उपलब्धतेसाठी सूक्ष्म नियोजनाची गरज तज्ञांनी व्यक्त केली आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी प्रमुख जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहतात. दूध संघांच्या आर्थिक संपन्नतेचाच त्याना आधार आहे. मात्र कोरोनामुळे दूध संघ आता आर्थिक अडचणीत सापडण्याची भीती आहे.