महाराष्ट्रात काहीच दिवसात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत एक नवा पक्ष सामील होण्याची शक्यता आहे. राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम महाविकास आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे. एमआयएममधील खात्रीलायक सुत्रांनी टीव्ही 9 मराठीला याबाबतची माहिती दिली आहे. एमआयएम आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये याबाबतची चर्चा सुरु आहे. ही चर्चा सकारात्मक झाली तर एमआयएम पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकतो.
राज्यात एमआयएमची महाविकास आघाडीसोबत आघाडी होण्याची शक्यता आहे. एमआयएमने महाविकास आघाडी सोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडीकडून सुद्धा एमआयएमलासोबत घेण्याची दाट शक्यता आहे. सन्मान जनक जागा मिळणार असतील तर आम्ही महाविकास आघाडीसोबत जाऊ, असं एमआयएमचं म्हणणं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही आघाडी होण्याची शक्यता आहे. यासाठी महाविकास आघाडी आणि एमआयएममध्ये चर्चा सुरु आहे. एमआयएम राज्यात किती जागांची मागणी करणार? ते महाविकास आघाडी मान्य करणार का? हे पाहणं येत्या काळात महत्वाचं असेल.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं 31 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना महाविकास आघाडी अधिक तयारीत असल्याचं दिसतं आहे. यासाठी इतर मित्रपक्षांना सोबत घेण्याच्या तयारीत महाविकास आघाडी असल्याचं दिसत आहे. जर ही आघाडी झाली तर राज्यातील राजकीय समिकरणं बदलू शकतात.
एमआयएम महाविकास आघाडीत येण्याची शक्यता आहे. एमआयएमला मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे. त्याचा फायदा महाविकास आघडीला होऊ शकतो. शिवाय लोकसभा निवडणुकीत एमआयएमने छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढली होती. मात्र तिथे एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा पराभव झाला. अशातच जर महाविकास आघाडीसोबत एमआयएम पक्ष आला तर त्यांनाही या निवडणुकीत फायदा होऊ शकतो. मात्र जागावाटपात कुणाला किती जागा मिळणार? यावर एमआयएम आणि मविआची आघाडी होणार की नाही? हे अवलंबून असेल.