गृहमंत्रालय हातात असताना ही नौटंकी कशाला? राज ठाकरेंना मोठं करण्याचा भाजपचा डाव, खा. इम्तियाज जलील यांनी फटकारलं
तुमच्या हातात गृहमंत्रालय होतं तर ही नौटंकी कशासाठी करताय, असा सवाल खा. जलील यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना केलाय.
संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आदल्या दिवशी माहिम दर्ग्यावरून (Mahim dargah) इशारा द्यावा आणि दुसऱ्या दिवशी मुंबई पोलिसांनी दर्ग्यावर कारवाई करावी. हा सगळा भाजपच्या षडयंत्राचा भाग आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमोर राज ठाकरे यांना मोठं करण्यासाठी भाजपने हा डाव रचला आहे. सत्तेतीव शिवसेना, भाजप आणि मनसे या सगळ्यांची ही मिलिभगत आहे, असा घणाघात खा. जलील यांनी केलाय. राज ठाकरे यांनी इशारा दिल्यानंतर ही कारवाई झाली. तुमच्या हातात गृहमंत्रालय होतं तर ही नौटंकी कशासाठी करताय, असा सवाल खा. जलील यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना केलाय. नवी दिल्लीत त्यांनी टीव्ही9 च्या प्रतिनिधीशी संवाद साधला.
‘उद्धव ठाकरेंना फिनिश करायचंय’
उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी मनसे, भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्रितपणे काम करतेय, असा आरोप खा. जलील यांनी केलाय. हे सरकारमध्ये असल्याने त्यांना हिंदू-मुस्लिम भेद करता येत नाहीत. मर्यादा येतात, त्यामुळे राज ठाकरे यांच्यासारख्या बाहुल्यांकडून असं वदवून घेतलं जातं, असा आरोप खा. जलील यांनी केलाय.
खरच प्रामाणिक असते तर…
राज ठाकरे यांनी दिलेला इशारा प्रामाणिक असता तर राज्यभरातील सगळ्याच अनधिकृत धार्मिक स्थळांवर ते बोलले असते. राज्यात अनेक ठिकाणी अशी कित्येक धार्मिक स्थळं आहेत. अनेक ठिकाणी आधी एक दगड ठेवण्यात येतो. त्याला बाँडरी होते. मग दगडावर विशिष्ट रंग येतो. त्यावर एक झेंडा येतो. त्यानंतर एक पुतळा होतो आणि त्यावर मंदिर उभारण्यात येतं.तुमच्यात प्रामाणिकपणा असता तर तुम्ही राज्यातील सर्वच ठिकाणांवर बोलायला हवं होतं, असं वक्तव्य खा. जलील यांनी केलंय.
आदित्य ठाकरेंना मानावं लागेल
राज ठाकरे यांनी इशारा देण्याला काहीही अर्थ नाही. त्यांचे ना धड आमदार आहेत ना खासदार, केवळ एका राजकीय पक्षाचे नेते म्हणून त्यांचा इशारा का मनावर घ्यावा, असा सवाल खा. जलील यांनी केलाय. याउलट आदित्य ठाकरे हिंमत दाखवून मैदानात, निवडणुकीला उतरायला तयार आहेत. त्यांना मानावं लागेल, अशी प्रतिक्रिया खा. जलील यांनी दिली.
श्रीरामाने बुद्धी द्यावी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व शिवसेना आमदार, खासदार येत्या काही दिवसात अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. त्यावरूनही खा. जलील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, त्यांनी खुशाल जावं. पण श्रीरामांनी त्यांना हा जातीचा खेळ थांबवण्याची बुद्धी द्यावी. भाजपकडून लोकशाहीचा खेळ सुरु आहे, तो थांबवावा. महाराष्ट्र राज्य कसं चालवायचं आहे, याची बुद्धी त्यांना द्यावी, अशी मी प्रार्थना करतो.